वाल्हे: पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या काळदरी, चिव्हेवाडी, बहिरवाडी, पानवडी, बांदलवाडी, कोंडकेवाडी परिसरात सध्या रानभाज्यांचा मुबलक बहर पाहायला मिळत आहे. या भागातील नागरिक दैनंदिन आहारात औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.
बहिरवाडी ग्रामपंचायत सदस्या पूजा चिव्हे व स्थानिक आदिवासी महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात सध्या 15 प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत. या वर्षी मान्सूनपूर्व पाऊस मुबलक झाल्याने आणि पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे रानभाज्या अपेक्षेपेक्षा लवकर बहरल्या आहेत. चिंचारडी, शेंडवळ, केना, कर्टुले, पत्राची भाजी, मोरचवडा, आळींब, चिवळ, रान कुरडू, रान आळू, गायफळ, टाकळ्या, रान भोपळा, तांदुळजा, मायाळू, पाथरी आदी रानभाज्या या डोंगररांगांमध्ये आढळतात. (Latest Pune News)
ग्रामपंचायत सदस्या संगीता भगत यांच्या मते, भाज्या तयार करताना कडधान्यांच्या डाळींचा वापर केला जातो, ज्यामुळे चव आणि पौष्टिकता वाढते. या भाज्यांमध्ये लोह, जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात आणि त्या मधुमेह, रक्तदाब, रक्तदोष तसेच स्त्रियांच्या आजारांवर उपयुक्त ठरतात. रोगप्रतिकारक शक्ती व पचनक्रिया सुधारण्यासाठीही त्या लाभदायक आहेत.
पुरंदर किल्ल्याच्या परिसरात अनेक आदिवासी खेडी असून ग्रामीण जीवनशैलीचा व त्यांच्या आहाराचा विचार केला असता या रानभाज्या आहारात उपयोग केल्याने या परिसरातील नागरिकांची प्रतिकारशक्ती जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
या परिसरातील अनेक आदिवासी लोक पारंपरिक आहारामुळे निरोगी जीवन जगत आहेत. पावसाळ्यात बाजारपेठेत जाणे अवघड असल्याने शेतातील कामासोबतच रानभाज्यांचा वापर हा त्यांचा मुख्य आहार असतो. पासष्टवर्षीय रत्नाबाई चिव्हे म्हणाल्या, ’मी लहानपणापासून रानभाज्या खाते, आजपर्यंत कोणताही आजार झालेला नाही.’ या वेळी मैनाबाई चिव्हे, संगीता चिव्हे, प्रियांका भगत आदी उपस्थित होत्या.