

जुन्नर: घरगुती वादातून पतीने कोयत्याचे सपासप वार करून पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 21) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घंगाळदरे (ता. जुन्नर) येथे घडली. अलका शंकर बांबळे (वय 33) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पती शंकर बांबळे व सासू लीलाबाई बारकू बांबळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, घटना घडल्यानंतर दोघेही फरार झाले. याबाबत राजश्री अरविंद विरणक (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत जुन्नर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अलका बांबळे हिचे पती शंकर बांबळे व सासू लीलाबाई यांच्यासोबत पटत नसल्याने त्या घोडेगाव येथे राजश्री विरणक यांच्या सासूची देखभाल करण्यासाठी राहात होत्या. दरम्यानच्या काळात शंकर हा घोडेगाव येथे येऊन अलका यांचा मोबाईल तसेच महत्त्वाची कागदपत्रे असलेली फाईल घेऊन गेला. याबाबत अलका यांनी राजश्री वीरणक यांना सोबत येऊन कागदपत्रे व मोबाईल मिळण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.
राजश्री विरणक, मयत अलका हिची मैत्रीण मीना धादवड व धादवड यांची मुलगी हे सर्व शुक्रवारी (दि. 21) दुपारी दोनच्या सुमारास शंकर बांबळे यांच्या घरी गेले. या वेळी अलका व पती शंकर आणि सासू लीलाबाई यांच्यात वाद झाला. शंकर याने अलका हिस जिवे मारण्याच्या उद्देशाने कुर्हाडीचा घाव घालण्याचा प्रयत्न वीरणक यांनी कुर्हाड पकडल्याने फसला.
यानंतर शंकर याने घरातील कोयत्याने अलका हिच्या पाठीवर वार केल्याने अलका हिच्यासोबत आलेल्या वीरणक, मैत्रीण मीना धादवड व त्यांची मुलगी हे सर्व जण घराबाहेर पळाले. या वेळी पायाला ठेच लागल्याने अलका खाली पडली व याच संधीचा फायदा घेत शंकर बांबळे याने अलका हिचे डोक्यात व शरीरावर कोयत्याचे सपासप वार केले.
डोळ्यासमोरच घडलेल्या घटनेने अलका हिच्यासोबत आलेल्या महिलांनी थेट जुन्नर पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर जुन्नर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे अलका बांबळे हिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी संशयित शंकर बांबळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील जंगलात फरार झालेल्या आरोपीचा ड्रोन कॅमेरा तसेच डॉग स्कॉडच्या साहाय्याने शोध घेतला जात आहे.
शनिवारी (दि. 22) सहआरोपी लीलाबाई बारकू बांबळे यांना पोलिसांनी अटक केली असून आरोपी शंकर बांबळे यासही लवकरच अटक करण्यात येईल. परिसरातील ग्रामस्थांना बांबळेविषयी माहिती मिळाल्यास त्यांनी जुन्नर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
- किरण अवचर, पोलिस निरीक्षक, जुन्नर