

पुणे : रस्तादुरुस्तीचे दर्जेदार काम करण्यासाठी डांबर व खडीचे गरम मिश्रण वा ‘कोल्डमिक्स’ वापरणे गरजेचे असते. मात्र, पावसाळापूर्व रस्तेदुरुस्तीसाठी पथ विभागाच्या कर्मचार्यांकडून शिळा माल वापरला जात आहे. परिणामी, रस्तेदुरुस्तीच्या कामाचा दर्जा खालावला असून, रस्त्यावर पुन्हा खड्डे पडून खडी रस्त्यावर पसरत आहे. ऐन पावसाळ्यात या खडीवरून वाहने घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
शहरातील रस्ते पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त करण्याचे नियोजन पालिकेच्या पथ विभागामार्फत करण्यात आले होते. 7 जूनपर्यंत ही कामे पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, त्यापूर्वीच पाऊस सुरू झाल्याने शहरातील रस्तेदुरुस्तीचे नियोजन बारगळले आहे. भरपावसात महापालिकेच्या कर्मचार्यांमार्फत रस्तेदुरुस्ती सुरू आहे.
मात्र, खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स वापरणे गरजेचे असताना शिळा माल वापरला जात आहे. यामुळे पुन्हा खड्डे पडून रस्ता आणखी खराब होत आहे. शहरातील खड्डे हे शास्त्रोक्त पद्धतीने भरले जातील, असा दावा देखील पालिकेने केला होता. मात्र, शिळा माल वापरून थातूरमातूर खड्डे बुजवले जात आहेत.
शहरातील खड्डेदुरुस्तीचे नियोजन 7 जूनपर्यंत करण्याचे होते. मात्र, त्या आधीच पाऊस आला. खड्डेदुरुस्तीसाठी शिळा माल वापरला जात असेल, तर हे गंभीर आहे. याबाबत कर्मचार्यांना सूचना देऊन कामे चांगले होईल, याकडे लक्ष ठेवले जाईल.
अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख, महापालिका
हा प्रकार पथ विभागाच्या अधिकार्याच्या निदर्शनास आणून दिला असता, या प्रकाराबाबत अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. शहरातील रस्ते चांगल्या पद्धतीने भरले जात असल्याचा दावादेखील अधिकार्यांनी केला.
मात्र, त्यांना रस्तेदुरुस्तीचे व्हिडीओ दाखवल्यावर त्यांना या प्रकरणाचा उलगडा झाला. यानंतर त्यांनी अधिकार्यांना सूचना करून शहरातील रस्तेदुरुस्ती चांगल्या पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या.