Pune News: पर्वती विधानसभा मतदारसंघावर मागील तिन्ही विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व युतीने विजय मिळवून हॅटट्रिक साजरी केली आहे. त्यांच्या विजयी चौकाराला लगाम घालण्यासाठी महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे असून, अद्यापही त्यांच्याकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही.
त्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाकडे राहणार, यावरून तर्क-वितर्क सुरू आहेत. महायुतीने माधुरी मिसाळ यांना चौथ्यांदा उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, याची उत्सुकता या मतदारसंघात आता लागून राहिलेली आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघ हा शहरातील सर्वाधिक झोपडपट्ट्यांचे जाळे असलेला म्हणून जसा ओळखला जातो, तसाच तो उच्चभ्रूंचे प्रमाण जास्त असलेला म्हणूनही कायम चर्चेत राहतो. या मतदारसंघावर सलग तीन वेळा भाजपने विजयश्री खेचून आणलेली आहे. त्यामध्ये माधुरी मिसाळ यांनी प्रथम 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सलग तीन वेळा विजय संपादन केलेला आहे.
भाजपचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी शंभर टक्के नाराजीचा सूर जाहिररीत्या आळवला. शिवाय दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करू, असेही सांगितले असले तरी ते अद्यापही आपले पुढील पत्ते खुले करीत नसल्याचे चित्र आहे.
सर्व इच्छुकांची नाराजी दूर करून भाजपला या ठिकाणी चौथ्यांदा आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींना ताकद लावावी लावणार आहे. त्यामुळे अशा इच्छुक उमेदवारांची नाराजी कशी दूर होते, त्यावर उमेदवाराच्या सांघिक प्रचाराचा जोर अवलंबून राहण्याची शक्यता आहे.
पर्वती विधानसभेसाठीच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर अधिक चर्चा होताना दिसत आहे. तसेच, याच पक्षातून सचिन तावरे हेसुद्धा इच्छुक आहेत. त्यामुळे या दोघांपैकी एकाची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुसरीकडे हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा म्हणून काँग्रेसचे नेते आणि मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आबा बागुलही इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मात्र, पर्वतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्यामुळे बागुल हे आता काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेना, काँग्रेस यामधील इच्छुकांची नावेही चर्चेत
पर्वतीच्या मागील तीनही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील शिवसेनेला आणि काँग्रेसला द्यावा, अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात येते.
त्यामुळे मूळची येथील जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष खरोखरच महाविकास आघाडीतील अन्य कोणत्या पक्षाला देणार का, आणि त्यांचा संभाव्य उमेदवार कोण असेल, यावर तर्क-वितर्क सुरू आहेत. त्यामध्ये माजी नगरसेवक बाळा ओसवाल, श्रीनाथ भिमाले अशीही नावे चर्चेत येत आहेत. याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.