वाघोली: वाघोली-आव्हाळवाडी रस्त्याच्या बाजूने गेल्या आठ दिवसांपासून रात्रीच्या वेळी साधारण एक ते दीड फूट खोदकाम करून उच्च दाबाची विद्युत केबल टाकण्याचे काम सुरू होते. या कामासाठी संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असताना महावितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यालगत रात्रीच्या वेळी खोदकाम करून उच्च दाबाची केबल टाकण्याचे काम सुरू होते. रस्त्याची खोदाई करून साधारणत: एक ते दीड फुटावरच केबल टाकण्यात येत आहे. हे काम नेमके कोण करत आहे, याबाबतची माहिती मिळाली नाही.
महावितरणचे सहायक अभियंता दीपक बाबर यांच्याशी संपर्क केला असता, असले कुठलेही काम महावितरणकडून सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता अश्विनी तोंडाळे यांच्याशी संपर्क केला असता, हे काम थांबवण्याबाबत महावितरणला पत्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
सहायक अभियंता बाबर यांना याबाबत विचारले असता, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम थांबवण्याबाबत कुठलेही पत्र प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नेमके हे काम कोणाचे आहे, असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. दोन्ही विभागांच्या अधिकार्यांमध्ये समन्वय नसल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता अश्विनी तोंडाळे यांनी हे काम थांबवले असल्याचे सांगितले आहे. मात्र, बहुतांश काम पूर्ण झाल्यानंतर ते थांबविण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अधिकार्यांच्या संगनमताने काम?
या रस्त्याची दुरवस्था झाली असताना त्यातच रस्त्याच्या बाजूचेच खोदकाम करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असताना संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या कामाबाबत कुठेही फलक लावण्यात आलेला नाही. कोणीतरी खासगी व्यक्ती अधिकार्यांच्या संगनमताने हे काम करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.