

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची लोकसभेसाठीची भूमिका अजून पुढे आलेली नाही. पाटील यांची विधानसभेची तयारी मात्र जोरात सुरू आहे. पाटील यांनी तालुक्यातील सातही जिल्हा परिषद मतदारसंघांत 'विजय संकल्प 2024' मेळावे घेऊन विधानसभेची वातावरण निर्मिती केली आहे. त्याच धर्तीवर आता इंदापूर शहरात 'विजय संकल्प' मेळावा घेण्याची तयारी सुरू झाली आहे. सोमवारी (दि. 18) शहरातील दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सभागृहात तालुक्यातील व शहरातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक पाटील यांनी घेतली. या बैठकीत लोकसभेच्या भूमिकेबाबत काहीच चर्चा झाली नाही, तर फक्त यामध्ये इंदापूर शहरात घेण्यात येणार्या मेळाव्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
रविवारी (दि. 17) बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीची समन्वय बैठक पार पडली. या वेळी हर्षवर्धन पाटील व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या होत्या. हर्षवर्धन पाटील यांची भूमिका काय असणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे; त्याच अनुषंगाने आजची बैठक पार पडली की काय? अशी चर्चा होती. परंतु, लोकसभेवर या बैठकीत काहीच चर्चा झाली नाही.
भाजपचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे लोकसभा निवडणुकीअगोदर इंदापूर विधानसभेच्या जागेच्या शब्दावर अडून बसले आहेत. आत्तापर्यंत इंदापूर विधानसभेचा विषय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कक्षेत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता हा इंदापूरच्या जागेचा प्रश्न दिल्ली दरबारात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या कोर्टात गेला असून, त्यांच्या समक्ष विधानसभेचा शब्द मिळावा, या अपेक्षेवर महायुतीचे काम करण्याची पाटील यांनी तयारी दर्शविली असल्याचे खात्रीलायक समजते आहे.
हेही वाचा