

पुणे: सोलापूर विमानतळावरून उड्डाण कधी सुरू होणार? कुठे सुरू होणार? हे देखील सरकारमधील काही महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींनी मागे जाहीर केले होते, पण तसे झालेले नाही. यामुळे अपेक्षाभंग झालेल्या लोकांच्या नाराजीबरोबरच सरकारला त्यांच्या व प्रवाशांच्या मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे. अजूनही सोलापूर विमानतळावरील सेवेबाबत प्रश्नचिन्ह आहे. येथील विमानोड्डाणे कधी सुरू होतील, असा सवाल प्रवासी आणि हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी विचारला आहे.
अलीकडच्या काळात पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल, सोलापूर विमानतळाचे नूतनीकरण व विस्तार केलेले टर्मिनल यासारख्या महत्त्वाच्या लोकप्रकल्पांचे काम अपुरे असताना व काही आवश्यक परवानगी मिळाल्या नसताना त्यांचे उद्घाटन करण्यात आले.
यामुळे उद्घाटन होऊनदेखील या सुविधा पूर्ण क्षमतेने प्रवाशांसाठी व विमानसेवेसाठी त्वरित उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. खरेतर संबंधितांनी असे करण्याची काहीच गरज नव्हती. मोदी सरकार आपल्या उत्तम व प्रामाणिक विकास कामांनी जनतेचा विश्वास संपादन करीत आहे.
विशेषतः देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत झालेला विकास हा अभूतपूर्व आहे.पुणे विमानतळावरील सर्व उड्डाणे नवीन टर्मिनलमधून तसेच सोलापूर विमानतळावरून उड्डाणे लवकरात लवकर सुरू करून याची दुरुस्ती केली पाहिजे, असेही वंडेकर यांनी या वेळी सांगितले.