शिवकालीन विहीर संवर्धनासाठी ग्रामस्थ सरसावले

विहिरीचा आकार शिवलिंगासारखा
Well conservation during Shiva period
शिवकालीन विहीर संवर्धनPudhari
Published on
Updated on

छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा जिवंत वारसा लाभलेल्या मोसे खोरे मावळातील कादवे (ता. राजगड) गावातील शिर्केवाडी येथील दुर्लक्षित शिवकालीन विहिरीच्या संवर्धनासाठी स्थानिक ग्रामस्थ सरसावले आहेत.

ग्रामस्थ व कादवे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने या शिवकालीन विहिरीची नोंद राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाने ‘असंरक्षित स्मारक’ म्हणून नुकतीच केली आहे. कादवेचे सरपंच संतोष बिरामणे, उपसरपंच सुरेश जागडे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शिर्के, युवक कार्यकर्ते विनोद बिरामणे आदींनी विहिरीच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. या विहिरीची नोंद कोठेही नाही. मात्र, या जागेचा 7/12 उतारा आहे. त्यामुळे कादवे ग्रामपंचायतीने शिवकालीन विहिरीची नोंद होऊन जतन करण्याचा ठराव पुरातत्व विभागाला दिला होता. त्यानंतर पुरातत्व विभागाने ’असंरक्षित स्मारक’ म्हणून विहिरीची नोंद केली. कादवेपासून 12 किलोमीटर अंतरावर शिरकोली (ता. राजगड) येथे शिवकालीन श्री शिरकाईदेवी मंदिर आहे. शिर्के घराण्याचे कुलदैवत म्हणून श्री शिरकाई देवस्थानची ओळख आहे. वाटसरू, भाविकांच्या सोयीसाठी शिवकाळात शर्केवाडी येथे ही विहीर बांधली असावी, असे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी सांगितले.

विहिरीचा आकार शिवलिंगी

विहिरीचा आकार शिवलिंगासारखा असून, रायगड पायथ्याच्या पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या वाड्यातील विहिरीसारखे बांधकाम आहे. या विहिरीतील पाणी काढण्यासाठी कठड्यावर लाकडी मोट होती. कपडे धुण्यासाठी तसेच जनावरांना पाणी पाजण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. विहिरीच्या भिंतीत गुहा आहेत. त्यामुळे शत्रूला चकवा देण्यासाठी विहिरीचा उपयोग होत असे. काळाच्या ओघात पडझड झाली तरी मूळ विहीर सुस्थितीत आहे. विहिरीत उतरण्यासाठी 45 दगडी पायर्‍या आहेत. विहिरीतील पाण्याचा उपसा नसल्याने शेवाळाचे थर तयार झाले आहेत. शासनाकडून विहिरीच्या संवर्धन व जतनासाठी निधी मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

चिरेबंदी दगडात विहिरीचे बांधकाम आहे. शिर्केवाडी, कादवे गावासह परिसरातील वाड्या-वस्त्यांतील रहिवाशांना या विहिरीचे पाणी वर्षभर पुरत असे. मात्र, आता घरोघरी नळाचे पाणी आल्याने काळाच्या ओघात विहिरीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे विहिरीतील पाण्याचा वापर थांबला आहे.

-विनोद बिरामणे, स्थानिक कार्यकर्ते

कादवे ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार पुरातत्व विभागाच्या ‘असंरक्षित स्मारका’च्या यादीत या शिवकालीन विहिरीची नोंद घेण्यात आली आहे.

- डॉ. विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news