

पुणे: विवाह समारंभात चोरट्याने दोन लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना लोणी काळभोर भागातील एका मंगल कार्यालयात घडली. याबाबत नमीता सुभाष मोरे (वय ५४, रा. सूर्ववंशी टाॅवर, भेकराईनगर, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे यांच्या मुलाचा विवाह रविवारी (९ नोव्हेंबर) लोणी काळभोरमधील एका मंगल कार्यालयात पार पडला. कुंजीरवाडी परिसरात हे मंगल कार्यालय आहे. मोरे यांनी स्टेजजवळ पिशवी ठेवली होती. पिशवीत दोन लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते.
मोरे यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दागिने ठेवलेली पिशवी चोरून नेली. पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याबाबत पोलिस हवालदार माने तपास करत आहेत. सध्या लग्नसराइचे दिवस सुरू आहेत. विवाह समारंभातून ऐवज चोरीला जाण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.