

येरवडा: गांधीनगर भागात गेल्या शनिवारपासून (दि. 14) पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, टँकरची एकच फेर होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
गांधीनगर परिसरातील पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद झाला आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना अजूनही परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करता आला नाही. बिघाड नेमका कुठे झाला आहे, हेच त्यांना अद्याप सापडले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे प्रशासनाकडून या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी तीन टँकरची गरज असताना केवळ एकच टँकर देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
परिसरातील पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यात यावा; अन्यथा नागरिकांच्या वतीने मोर्चा काढण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी प्रभाग तीनचे अध्यक्ष मनोज ठोकळ, प्रशांत शिंदे, नितीन नवगिरे, अविनाश जाधव, तेजस कांबळे आदी उपस्थित होते.