मंचर: यंदाचा उन्हाळा कडक असल्याने आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंचायत समितीच्या वतीने तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातील 11 गावांना 11 टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या 11 टँकरच्या दिवसभरात 30 ते 35 फेर्या होत आहेत, अशी माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांनी दिली.
तालुक्याच्या पूर्व भागात लोणी, धामणी, शिरदाळे, वडगावपीर, मांदळवाडी तसेच सातगाव पठारावरील पारगाव तर्फे खेड, कुरवंडी, थुगाव, भावडी, कारेगाव व निघोटवाडी या 10 गावांना दरवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या भागात यावर्षी पाऊस कमी झाल्याने तसेच परतीचा पाऊस न पडल्याने लवकरच दुष्काळसदृश्य परिस्थिती जाणवू लागली आहे.
पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर झाला आहे. सद्य:स्थितीत पूर्व भागातील गावांना व सातगाव पठारावरील गावांना पंचायत समितीच्या वतीने 11 टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दिवसभरात टँकरच्या 30 ते 35 फेर्या होत आहेत. काही गावातील विहिरीमध्ये टँकरद्वारे पाणी सोडून गावची तहान भागवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेथे विहिरी नाहीत, तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
आदिवासी भागातही टँकर सुरू करणार
भविष्यात मागणी वाढल्यास टँकरची संख्या वाढवली जाईल, तसेच तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील माळीन, राजेवाडी, तिरपाड, चिखली, कुशिरे, फुलवडे, बोरघर या गावांच्या ग्रामपंचायतीचे टँकर चालू करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाला आहे. या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करूनच टँकरने पाणीपुरवठा चालू केला जाईल, असे गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांनी सांगितले.
सध्या एप्रिल महिना सुरू आहे. एप्रिल व मे हे तीव्र उन्हाळ्याचे महिने आहेत. आत्ताच 11 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून भविष्यात आदिवासी भागासह, तालुक्यातील पूर्व भागातदेखील पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक भेडसावू शकते. या दृष्टीने प्रशासनाने आतापासूनच योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- सागर काजळे, उपाध्यक्ष, भैरवनाथ पतसंस्था मंचर