वडगाव शेरी: लष्कर जलकेंद्रातील तांत्रिक समस्यामुळे गेल्या चार दिवसांपासून वडगाव शेरीतील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या समस्येवर उपाययोजना केल्यानंतर गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार होता. परंतु बुधवारी (दि. 5) दुपारी भामा आसखेड धरणाच्या जॅकवेलची केबल जळाल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडल्याने वडगाव शेरीसह नगर रस्त्यावरील भागांचा पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही.
गेल्या चार दिवसांपासून वडगाव शेरीमध्ये अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत होता. टाटा गार्डन येथील पाण्याच्या टाक्या पूर्ण भरत नसल्याने नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत होता. ही पाण्याची समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयामध्ये आंदोलन केले होते. त्यानंतर नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता.
लष्कर जलकेंद्रातून पाणीपुरवठा सुरळीत होऊन काही तासच झाले होते. त्यातच बुधवारी (दि.5) दुपारी भामा आसखेडच्या जॅकवेलमध्ये केबल जळाल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली. परिणामी, या योजनेवर अवलंबून असलेल्या वडगाव शेरी, संजय पार्क, विमाननगर, म्हाडा कॉलनी, एसआरए, कुलकर्णी गॅरेज, यमुनानगर, राजीव गांधी नॉर्थ व साऊथ, तसेच विश्रांतवाडीचा काही भाग, धानोरी, लोहगाव, चंदननगर, खराडी आदी भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
महापालिकेच्या अधिकार्यांनी केबल दुरुस्त करण्याचे काम तत्काळ सुरू केले. पण ते काम 24 तासांनंतर संपले. यामुळे वडगाव शेरीतील नागरिकांना 24 तासांनंतरही पाणी मिळाले नाही. यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पंपिग स्टेशनवर टँकरही मिळेना
पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी टँकर मिळण्यासाठी पंपिग स्टेशनवर धाव घेतली. राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची गुरुवारी पंपिग स्टेशनवर गर्दी झाली होती. पण, ठेकेदारांनी टँकर ड्रायव्हरला अचानक घरी पाठवल्याने नागरिकांना टँकरच मिळाले नाहीत. पाणीपुरवठा अधिकारी आणि टँकरचालकांमध्ये वाद झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. याबाबत पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांशी संपर्क केला, पण त्यांनी माहिती दिली नाही.
पालिकेला नागरिकांचे निवेदन
चंदननगर, खराडी आणि वडगाव शेरी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नंदकुमार जगताप यांना गुरूवारी निवेदन दिले. ही समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावी; अन्यथा नगर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या वेळी माजी नगरसेविका उषा कळमकर यांनी दिला.गणेशनगर येथे आज
नागरिकांचे आंदोलन
वडगाव शेरी, खराडीतील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, तसेच नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिवसेनाच्या वतीने शुक्रवारी (दि. 7) गणेशनगर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक सचिन भगत यांनी दिली.
गेल्या चार दिवसांपासून आम्हाला पाणी मिळाले नसल्याने दररोज पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत आहेत. चार दिवसांनंतर आज सायंकाळी केवळ वीस मिनिटे पाणी सोडण्यात आले. वडगाव शेरी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने पाणीपुरवठा लवकर सुरळीत न केल्यास नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल.
अमृता हंबीर, रहिवासी, वडगाव शेरी
भामा आसखेड जलकेंद्रातील केबल दुरुस्तीचे काम गुरुवारी दुपारी पूर्ण झाले आहे. त्यामुळे वडगाव शेरी परिसरातील नागरिकांना सायंकाळी पाणीपुरवठा करण्यात आला. केबल जळाल्याने बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी सकाळी या भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. परंतु आता ही समस्या सुटली आहे.
अन्वर मुल्ला, अधिकारी, पाणीपुरवठा विभाग.