पुणे परिसरात बुधवारी (दि. 25) दिवसभर जोरदार पाऊस सुरू असल्याने उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ केली जात आहे. बुधवारी (दि. 25) सायंकाळी साडेसात वाजता विसर्ग 31 हजार 600 क्युसेकने सुरू होता. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
उजनी धरणातून भीमा नदीपात्रातून मंगळवारी (दि. 24) सायंकाळी 5 वाजता 5 हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बुधवारी सकाळी 10 वाजता पाण्याचा विसर्ग हा 10 हजार क्युसेकने करण्यात आला. त्यानंतर पुणे परिसरात पाऊस सुरू झाल्याने सायंकाळी साडेसहा विसर्ग वाढवून तो 20 हजार क्युसेक, त्यानंतर पुन्हा साडेसात वाजता वाढ करून तो 30 हजार क्युसेक इतका करण्यात आला. याशिवाय वीजनिर्मिती केंद्रातील 1 हजार 600 क्युसेक पाणी हे नदीपात्रात येत आहे. त्यामुळे नदीपात्रातील एकूण पाण्याचा विसर्ग 31 हजार 600 क्युसेक इतका सुरू आहे.
पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्गातही वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता उजनी धरणातील पाणीसाठा 122.29 टी.एम.सी. असून त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा 58.64 टी.एम.सी. एवढा आहे. सध्या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा 109.45 टक्के झाला आहे. तर धरणातून दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 60 क्युसेक, बोगद्यातून 40 क्युसेक, मुख्य कालव्यातून 1 हजार 800 क्युसेक याप्रमाणे पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान, दौंड येथून उजनी धरणामध्ये येणार्या पाण्याचा विसर्ग हा 10 हजार 558 क्युसेक होता. त्या विसर्गामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.