Baramati Agro : बारामती अँग्रो बंद झाल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग

प्रदूषणाच्या पाहणीला आता पाठविले पथक
pudhari news
बारामती अँग्रोpudhari
Published on
Updated on

बारामती : पारवडी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांनी शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील बारामती अॅग्रो या साखर कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर पडणाऱया राखेमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह संबंधित विभागांकडे केली होती. परंतु आता कारखाना बंद झाल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीने गावात येत पाहणीचा फार्स केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. या समितीने राखेद्वारे होत असलेले प्रदूषण मान्य केले आहे.

तक्रार दाखल केल्यावर तब्बल महिनाभरानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली. पारवडीत वायु प्रदुषण तपासणी करणारी फिरती प्रयोगशाळा पथक दाखल झाले. प्रत्यक्षात कारखाना बंद झाल्यावर प्रदुषणाची पातळी कमी झाल्यावर वायू प्रदुषण तपासणी व कारवाईचा फार्स प्रदुषण नियंत्रण महामंडळाने केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

गेल्या बारा वर्षापासून साखर कारखाना पारवडी ग्रामस्थ हे कारखान्यातून होणार्या प्रदुषणाला त्रासून गेले होते. त्यावर अर्ज विनंत्या करून ही वायू प्रदुषण रोखण्यात राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ अयशस्वी झाले. आमदार रोहित पवार यांच्या अधिपत्याखाली कारखान्याचे कामकाज चालते. अखेर ग्रामस्थांनी पवार यांचे विरोधक प्रा. राम शिंदे यांच्याकडे गार्हाणे मांडले. त्यानंतर पथक गावात पोहोचले. तत्पूर्वी ५ जानेवारी रोजी ग्रामस्थांनी कारखान्यावर रास्ता रोको आंदोलन करत प्रदूषण रोखण्याची मागणीही केली होती.

कारखाना बंद झाल्यावर प्रदुषण नियंत्रण मंडळाचे फिरते वायू तपासणी पथक पारवडी (ता.बारामती) गावात तपासणीसाठी दाखल झाले. मात्र साखऱ कारखाना बंद झाल्यावर तपासणी पथक दाखल झाल्याने ग्रामस्थांनी राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली.

ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार

पारवडी ग्रामपंचायतीने प्रदूषणाबाबत ठोस भूमिका घ्यावी अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकू असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रदूषणाबाबतचा ठराव ग्रामसभेत केला होता. आंदोलन केले तरी प्रदुषण कमी होण्याचे नाव घेत नव्हते. म्हणून विधानपरिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांना पारवडीतील तरूण भेटले. त्यावर कारखाना बंद झाल्यावर राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे वायु तपासणी पथक पारवडी गावात दाखल झाले आहे. हे म्हणजे वरातीमागून घोडे अशी गत झाल्याचे मत ग्रामस्थ तानाजी बाळासाहेब माळशिकारे यांनी व्यक्त केले.

प्रदुषणामुळे शेतीचा प्रश्न बिकट

गेल्या अनेक वर्षापासून पारवडी गावच्या हद्दीत बारामती अॅग्रो साखऱ कारखान्यामुळे प्रदुषण वाढले आहे. त्यामुळे शेतातील पिकांवर राख पडून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होत नाही. परिणामी पिकांची वाढ निट होत नाही. त्यामुळे पिकांना बाजारात भाव मिळत नाही. दुग्धउत्पादक शेतकरी हा चारा पिकांवर राख पडत असल्याने बेजार झाला आहे. दुधात अन्न-पाण्यात राख पडते आहे. म्हणून आम्ही तरूणांनी प्रदुषण विरोधा आंदोलन हाती घेतले आहे असे नीलेश शिवलिंग नगरे यांनी सांगितले.

वायू व जल प्रदूषणाचा प्रश्न भेडसावतो आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ राजकीय वरदहस्तामुळे आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे. धुराडे थंडावल्यावर पाहणी करत प्रदूषण महामंडळाने काय साधले ? आता राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या दुटप्पी भूमिकेविरोधात आम्हाला हरीत लवाद कायद्यानुसारच दाद मागावी लागेल.

ॲड. प्रदीप गुरव, ग्रामस्थ पारवडी, ता.बारामती,

अहवालात नेमके काय

प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी जयंत डोके व स. ज. भोई यांनी ग्रामस्थांसह संयुक्त पाहणी करत अहवाल दिला. त्यात कारखान्यापासून गावची हद्द १ किमी अंतरापासून सुरु होत असल्याचे नमूद केले. शेतातील पिकांवर धुराड्यातून पडलेली राख दिसून आली. ग्रामपंचायत कार्यालय आवारातही राख पडलेली दिसून आली. पिकांवर विपरित परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी म्हणणे मांडले. हवा तपासणीसाठी मोबाईल व्हॅन पारवडी येथे थांबविण्यात आली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news