धानोरी: लोहगाव-वाघोली पाणीपुरवठा योजनेंंतर्गत लोहगाव परिसरात जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी सुमारे 230 कोटी रुपये खर्च येणार आहे. वाघोलीसाठी सध्या लोहगाव हद्दीत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून, ते वर्षभरात पूर्ण होणार असल्याचे महापलिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
लोहगाव - वाघोली पाणीपुरवठा योजनेमुळे लोहगाव व वाघोली या दोन्ही गावांचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे. या योजनेसाठी वर्षभरापूर्वी जलवाहिनी टाकण्यासाठी सुमारे 230 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
वाघोलीसाठी सहा पाण्याच्या टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे. लोहगाव येथील पोरवाल रस्ता परिसरात नुकतेच भामा आसखेडचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे लवकरच वाघोलीच्या नागरिकांचीही पाणी टंचाईतून मुक्तता होण्याची चिन्हे आहेत.
वाघोलीसाठी लोहगाव येथील डी. वाय. पाटील महाविद्यालय ते वाघोली अशी सुमारे पंधरा किलोमीटर लांबीची व आठशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. सध्या लोहगावातील पवारवस्ती परिसरात जलवाहिनी टाकण्याचे काम चालू असून सुमारे दोन किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली असल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक परशुराम पवार यांनी दिली.
खोदकामामुळे नागरिकांची गैरसोय
पवारवस्ती परिसरातील रस्ते अरुंद आहेत. त्यातच आठशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी खोदाई केल्याने येथील रस्ता अनेक दिवसांपासून पूर्णपणे बंद झाला आहे. दुचाकी नेण्यासाठीही जागा शिल्लक नसल्याने परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लोहगाव- वाघोली पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 230 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या कामाचा कालावधी तीस महिन्यांचा आहे. सुमारे दोन किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. वर्षभरात वाघोलीसाठी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होईल.
-सुधीर अलुरकर, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.