

राजगुरुनगर: जिल्ह्यात तब्बल आठ- दहा वर्षांच्या खंडानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत असल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच होऊ शकते, परंतु त्यापूर्वीच आरक्षणांमुळे अनेकांचे पत्ते कट होणार आहेत.
यामध्ये खेड तालुक्यातील वाडा गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होणार असल्याने विद्यमान सदस्य अतुल देशमुख, माजी सदस्य व कात्रज दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, त्यांची पत्नी व माजी सदस्या मंगल चांभारे तसेच वाडा गटातून तीव्र इच्छुक माजी पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर या सर्व दिग्गजांचा पत्ताच कट झाला आहे. (Latest Pune News)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल पाच वर्षे निवडणुका घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य शासनाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे भाग पडले आहे. जिल्ह्यातील गट- गणांची रचना अंतिम झाली असून, आता सर्वांना आरक्षणाचे वेध लागले आहेत.
यामध्ये शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत काढताना पूर्णपणे नव्याने व लोकसंख्येच्या उतरत्या क्रमांने आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच आता पूर्वीची चक्राकार पध्दत संपुष्टात आली असून, संपूर्ण जिल्ह्यात नव्याने आरक्षण जाहीर होणार आहे. गणेश विसर्जनानंतर ही आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या गटांच्या आरक्षणासाठी अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीची उतरत्या क्रमानुसार लोकसंख्या जाहीर केली आहे. त्यानुसार खेड तालुक्यातील वाडा हा गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होऊ शकतो. या आरक्षणाचे पडसाद तालुक्याच्या राजकारणावर पडणार असून, देशमुख, पोखरकर यांचा निवडणुकीतील पत्ताच या आरक्षणाने कट होत आहे.
देशमुख यांना पाईट गटात संधी; बुट्टे पाटील : देशमुख आमनेसामने
अतुल देशमुख याचा सध्याचा गट फेररचनेत वाडा - वाशेरे गट झाला असून, हाच गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होईल. परंतु अतुल देशमुख यांचे गाव देशमुखवाडी पाईट गटामध्ये येत असल्याने त्यांना पाईट - आंबेठाण गटातून लढण्याची संधी मिळू शकते. परंतु देशमुख यांना कधीकाळी एकाच पक्षात असलेले व ज्याच्यामुळे पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आली असे भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांच्या विरोधात उभे राहावे लागेल. देशमुख यांना आपले गाव पाईट गटात असल्याने खरे तर हीच चांगली संधी असू शकते.
वाडा आणि वाशेरे गणही आरक्षित होऊ शकतात
खेड तालुक्यातील वाडा गट आणि त्यासोबतच गटातील दोन्ही वाडा आणि वाशेरे गणदेखील अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होऊ शकतो. तहसीलदार कार्यालयाने जाहीर केलेल्या लोकसंख्येनुसार व शासनाच्या नियमानुसार लोकसंख्येचा उतरता क्रम लक्षात घेतला तर वाडा आणि वाशेरेदेखील अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होऊ शकतो. यामुळेच मागील पंचायत समिती निवडणुकीत केंद्रस्थानी असलेल्या भगवान पोखरकर यांना ना गटात, ना गणांमध्ये निवडणूक लढविण्याची संधी मिळू शकते.