

इंदापूर: स्वराज्याचे संकल्पक श्रीशहाजीराजांच्या समाधीस्थळावर साधे पत्र्याचे छतदेखील नाही. अत्यंत वाईट अवस्था त्या ठिकाणी आहे. आपल्या कर्तृत्वाने, शौर्याने निजामशाही व आदिलशाहीवर दहशत असणार्या श्रीशहाजीराजांचे समाधीस्थळ दुर्लक्षित असणे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.
इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित मालोजीराजे व्याख्यानमालेत ‘शिवरायांच्या जीवनातील अज्ञात व अपूर्वक रोमहर्षक घटना’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगलसिद्धी उद्योग समूहाचे प्रवर्तक राजेंद्र तांबिले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब मोरे, गजानन गवळी उपस्थित होते.
विश्वास पाटील म्हणाले, छत्रपती श्रीशिवाजी महाराजांना निसर्गाचा प्रचंड अभ्यास होता. प्रकाश, ध्वनी, दिवस व रात्रीचा त्यांनी युद्धात पुरेपूर उपयोग केला. योग्य पद्धतीने मावळ्यांची निवड केली. सर्वाधिक खर्च गुप्तहेर खात्यावर केला. साधनसामग्री कमी असताना बलाढ्य शत्रूंशी सामना करताना आपले कमीत कमी नुकसान झाले पाहिजे याची काळजी त्यांनी घेतली. शिवराय एक व्यक्ती नसून, अनेक व्यक्ती त्यांच्या अंगी कार्य करत असत.
स्वागत कैलास कदम व सुनील गलांडे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष नरूटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शरद झोळ, योगेश गुंडेकर , साठे, विशाल गलांडे, तुषार हराळे, अमोल खराडे, दत्तराज जामदार, संदिपान कडवळे, रमेश शिंदे, अमोल साठे, सचिन जगताप, ओम जगताप, आदित्य कदम यांनी प्रयत्न केले.