

नसरापूर : नसरापूर-वेल्हा या रस्त्याचे काम ठेकेदाराने थांबवल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना रोजच करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भोरच्या माजी सभापतींसह नसरापूर ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी भर पावसात रस्त्यामध्येच ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 15 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नसरापूर (ता. भोर) गावातील मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करत भोर पंचायत समितीचे माजी सभापती लहुनाना शेलार यांनी भररस्त्यात ठिय्या मांडला. या वेळी ज्येष्ठ यशवंतराव कदम, माजी संचालक ज्ञानेश्वर झोरे, नसरापूरचे उपसरपंच सुधीर वाल्हेकर, सदस्य संदीप कदम, नामदेव चव्हाण, व्यापारी संघटनेचे प्रदीप राशिनकर, प्रकाश चाळेकर, सोमनाथ उकिरडे, राजू मिठाले, दत्तात्रय वाल्हेकर, सुरेश दळवी, राजू राशिनकर, आबा शेटे, संतोष पवार, समीर शिळीमकर, शशिकांत कदम, विजय गयावळ, दीपक भदे, किरण बांदल यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.
या वेळी संबंधित सार्वजनिक बांधकाम व ठेकेदाराच्या कामकाजाविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी. जी. गाडे यांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालून भोंगळ कारभाराबाबत जाब विचारला. तसेच लहुनाना शेलार, यशवंतराव कदम, ज्ञानेश्वर झोरे, सुधीर वाल्हेकर, संदीप कदम, नामदेव चव्हाण, आबा शेटे यांनी अधिकार्यांना प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र अधिकार्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार्यांचे नसरापूर रस्त्याचे काम करणार्या मे. इंडिकोन ठेकेदारावर कोणताच अंकुश नसल्याने रस्त्याचे काम दर्जाहीन होत असल्याचे आरोप करून मागील आठवड्यात ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते. ठेकेदाराकडून बजेटनुसार काम होत नसल्याचेदेखील ग्रामस्थांनी आरोप केले आले. काम पूर्ण करण्याची लेखी पत्र दिल्यानंतर ठिय्या आंदोलन तीन तासाने मागे घेण्यात आले. घटनास्थळी राजगड पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
दि. 23 फेब्रुवारी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर ठेकेदाराकडून काम सुरू होत नव्हते. याबाबत वेळोवेळी कासवगतीने काम तसेच भोंगळ कामामुळे उद्भवणार्या समस्यांबाबत दै. ‘पुढारी’ने देखील प्रकाशझोत टाकला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून ठेकेदाराने रस्त्याचे काम कासवगतीने केल्याने व्यापारीवर्गासह सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. लेखी आश्वासनानुसार वेळेत काम पूर्ण न झाल्यास मोठ्या स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल.
लहुनाना शेलार, माजी सभापती, भोर पंचायत समिती