निमोणे: अहिल्यानगर दक्षिणेच्या राजकारणात आपले राजकीय प्रस्थ पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भौगोलिकदृष्ट्या अतिशय अडचणीचा व खर्चीक साकळाई प्रकल्प आणून घोडच्या मूळ लाभक्षेत्राचे वाळवंट करण्याचा घाट घालत आहेत.
विखे पाटलांची दादागिरी लोकलढा उभारून आम्ही मोडीत काढू, असा गर्भित इशारा शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजय भोस यांनी दिला.साकळाई प्रकल्पाला दिवसेंदिवस तीव्र विरोध होत असून, लाभक्षेत्रातील सर्वपक्षीय जनतेतून उठावाची भाषा बोलली जात आहे. (Latest Pune News)
दरम्यान, विजय भोस आणि घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय काळे यांनी साकळाई प्रकल्पावर बोलताना सांगितले की, घोड धरणाची निर्मिती होत असताना हा प्रकल्प 10 टीएमसीचा होणार होता. मात्र, प्रत्यक्षात घोड धरण 7 टीएमसीचे झाले.
सन 1954 पासून धरणातील गाळ काढला गेला नाही. आजच्या घडीला धरण फक्त 5.9 टीएमसी व उपयुक्त पाणीसाठा 4.8 एवढेच आहे. घोडचे मूळ लाभक्षेत्र 20 हजार हेक्टरचे आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहत, शिरूर, श्रीगोंदा शहरासह दोन्ही तालुक्यांतील जवळजवळ 60 गावांमधील पिण्याच्या पाणी योजना घोड धरणावरूनच कार्यान्वित आहेत.
प्रत्येक वर्षी मार्च महिन्यातच घोड तळ गाठते, अशी विपरीत परिस्थिती असताना सत्तेच्या जोरावर आमच्या हक्काच्या पाण्यावर विखे पाटील घाला घालत असल्याचा आरोप काळे यांनी केला.
अहिल्यानगर दक्षिणेत स्वतःच्या मुलाचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर विखे पाटलांनी मागील 35 वर्षांपासून फायलीत बंद असलेले साकळाईचे भूत बाहेर काढले. श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील 32 गावांसाठी जवळजवळ 900 कोटी रुपयांच्या योजनेला विखेंनी राजकीय वजन वापरून मंजुरी मिळवली.
श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव या ठिकाणी पंप स्टेशन उभारून हे पाणी उचलले जाईल, असा डीपी आराखडा बनवून घेतला आणि घोडच्या लाभक्षेत्रातून विरोधात आवाज उठू नये, यासाठी कुकडी प्रकल्पातून अतिरिक्त 4.5 टीएमसी पाणी घोडमध्ये सोडण्याचे गाजर देखील दाखविले.
मुळात हे सर्व कागदावर छान दिसते. त्या 32 गावांचा विखे पाटलांना मनापासून कळवळा असेल, तर त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातून जो कुकडी कालवा जातो, त्यामधून श्रीगोंदा तालुक्यातील विसापूरच्या तळ्यात 4.5 टीमसी पाणी द्यावे व त्या ठिकाणावरून साकळाई योजना सुरू करावी, हे व्यवहारी गणित विखे पाटील मात्र नाकारतात.
सत्तेच्या जोरावर घोड लाभक्षेत्राचे वाळवंट करू पाहणाऱ्या विखे पाटलांना आपला बाल्लेकिल्ला सुरक्षित करायचा आहे आणि दुर्दैव असे की श्रीगोंदा असो की शिरूर, या दोन्ही तालुक्यांचे पहिल्या फळीतील नेतृत्व विखे पाटलांचा रोष नको, यासाठी उघडपणे पुढे येऊन साकळाईला विरोध करीत नसल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आता लाभक्षेत्रातील सामान्य शेतकरी संघटित होऊन साकळाई प्रकल्पाविरोधात लोकलढ्याची भाषा बोलू लागल्याचे भोस आणि काळे यांनी सांगितले.