

प्रसिद्ध लेखिका मीना प्रभू यांचे निधन झाले आहे. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्या बराचकाळ आजारी होत्या. प्रवास वर्णन ही त्यांच्या लेखनाची खासियत आहे. त्या पेशाने भुलतज्ञ होत्या.
मूळच्या पुणेकर असलेल्या पण विवाहानंतर लंडनमध्ये स्थिरावलेल्या आणि मराठीत प्रवासवर्णनपर लेखन सातत्याने करणाऱ्या डॉ. मीना प्रभू यांची प्रवासवर्णनाबरोबर कादंबरी आणि कवितासंग्रहही प्रकाशित झाले आहेत. पण त्यांची मराठी साहित्यात ओळख आहे ती प्रवासवर्णनकार म्हणूनच. पाच खंडात मुशाफिरी करून यथार्थ वर्णन मीना प्रभू यांनी केले. त्यांचे पहिले पुस्तक होते 'माझं लंडन'.
या पुस्तकाने मराठी साहित्यात एक नवा प्रवाह रूढ केला. मराठी माणसाला आता लंडन पूर्वीइतके अप्राप्य राहिलेले नाही. हे पुस्तक आले तेव्हापेक्षा जग अधिक जवळ आले. पण मीना प्रभू यांच्या या पुस्तकाची जादू मात्र आजही कायम आहे.