

कसबा पेठ: तिथीनुसार सोमवारी (दि. 17) साजर्या होणार्या शिवजयंतीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पेठांमध्ये विविध मंडळांकडून शिवजन्मोत्सवाची तयारी सुरू असल्याचे चित्र रविवारी दिसून आले.
श्री कसबा गणपती चौक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने सोमवार सायंकाळी साडेपाच वाजता शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. कसबा पेठ परिसरातील उंबर्या मारुती मंडळ, श्रीमंत पेशवे गणेश मंदिर, नवग्रह मित्रमंडळ, नेहरू तरुण मंडळ, दिग्विजय सेवा प्रतिष्ठान, जिजामाता तरुण मंडळ आणि फणी आळी तालीम मंडळ एकत्रित शिवजयंती साजरी करणार असल्याचे अध्यक्ष महेश मोळावडे यांनी सांगितले.
पारंपरिक शिवजन्म सोहळा तसेच प्रतापगडाचा रणसंग्राम, हिरकणीची शौर्यगाथा आदी ऐतिकासिक प्रसंगाचे दीडशे कलाकार सादरीकरण करणार आहेत. या सोहळ्याचे उद्घाटन पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उद्योजक पुनीत बालन यांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे. श्री कसबा गणपती चौकात बालकलाकारांकडून रायगड किल्ल्यांची भव्य प्रतिकृती शिल्पकार सुरेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात येणार आहे.
मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके
सोमवार पेठेतील सम्राट ग्रुप, विजय मित्रमंडळाच्या वतीने भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. केंद्रीय हवाई तथा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, गणेश बिडकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. मर्दानी खेळ, मल्लखांब, योगा आदींचे या वेळी सादरीकरण करण्यात येणार असल्याचे मंडळाचे मार्गदर्शक विशाल दरेकर यांनी सांगितले.