

Vanchit Protest Against Sanyasta Khadga play : स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत 'सन्यस्त खड्ग' नाटकाच्या प्रयोगादरम्यान पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठा गदारोळ झाला. या नाटकात तथागत गौतम बुद्ध आणि भिक्खू संघाविषयी आक्षेपार्ह आणि अपमानकारक संवाद असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात घुसून प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यामुळे नाट्यगृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पुण्यातील प्रतिष्ठित यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात, शनिवारी सायंकाळी 'संगीत सन्यस्त खड्ग' या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. प्रयोग सुरू असताना अचानक वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते प्रेक्षकांमध्ये उभे राहिले . त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. "तथागत गौतम बुद्धांचा अपमान सहन करणार नाही," "भिक्खू संघाचा अवमान खपवून घेणार नाही," अशा घोषणांनी नाट्यगृह दणाणून गेले.कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत रंगमंचाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला आणि नाटक तात्काळ थांबवण्याची मागणी केली. या अनपेक्षित प्रकारामुळे नाट्यप्रयोगात व्यत्यय आला. प्रेक्षकांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
नाट्यगृहातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, आयोजकांनी आणि नाट्यगृह व्यवस्थापनाने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम होते. अखेरीस, पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नाट्यगृहाच्या बाहेर काढले. या सर्व गोंधळात सुमारे पंधरा ते वीस मिनिटे नाटकाचा प्रयोग थांबला होता. पोलीस बंदोबस्तात नाटकाचा प्रयोग पुन्हा सुरू करण्यात आला.
"संगीत सन्यस्त खड्ग या नाटकातून तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या मानवतावादी विचारांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. भिक्खू संघाला चुकीच्या पद्धतीने चित्रित करून सामाजिक भावना दुखावण्याचा हा प्रकार आहे. हा केवळ कलाविष्कार नसून एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार आहे," असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.यापुढे महाराष्ट्रात कुठेही 'संगीत सन्यस्त खड्ग' या नाटकाचा प्रयोग आयोजित केल्यास, तो उधळून लावला जाईल, असा सज्जड इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
संगीत संन्यस्त खड्ग या नाटक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले आहे. सावरकर दर्शन प्रतिष्ठान निर्मित आणि नाट्यसंपदा कला मंच सहनिर्मित या नाटकाचे याच महिन्यात नव्या स्वरुपात रंगभूमीवर पुनरागमन झाले आहे. या नाटकाचे दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. निर्माता रवींद्र माधन साठे असून, सहनिर्मात अनंत वसंत पणशीकर आहेत.