

चाले येथे बाह्यवळण मार्गावरून पाणी
रस्ता वाहतूकीसाठी बंद
पौड : चाले (ता. मुळशी) येथे असलेल्या वळकी नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने शेजारी नदीपात्रात पाईप टाकून तयार केलेला बाह्यवळण मार्ग मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला. परिणामी येथील वाहतूक बंद करण्यात आली असून पौड पासून कोळवण भागातील १६ गावांचा संपर्क तुटला आहे.
पौड येथून कोळवणकडे जाणारा रस्ता पुढे पवनानगर, कामशेत, लोणावळा भागात जातो. या मार्गावर सतत वर्दळ असते. वळकी नदीवर असलेला पूल जीर्ण व धोकादायक झाला होता. या भागातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार माजी आमदार संग्राम थोपटे यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. हा पूल पाडून शेजारीच पाईप व भराव टाकून बाह्यवळण मार्ग करण्यात आला होता. मात्र ठेकेदाराने दिलेल्या वेळेत काम पूर्ण केले नाही. परिणामी गेले काही दिवस मुळशी तालुक्यात जोरदार सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वळकी नदीला मोठया प्रमाणात पाणी आले असून हा पूल सोमवारी (दि. २६) रात्री पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल व रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला असून १६ गावांचा पौडशी संपर्क तुटला आहे.