कोरेगाव भीमा: छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे असून, पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देणारे त्यांचे वढू येथील समाधिस्थळ आणि तुळापूर येथील बलिदानस्थळाला पर्यटनक्षेत्र नव्हे, तर तीर्थक्षेत्राचाच दर्जा देण्यात येईल पुढील वर्षापासून पुण्यतिथीदिनी सार्वजनिक सुटी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 336 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते, त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांनी ही घोषणा केली. तत्पूर्वी शिंदे हे शंभूचरणी नतमस्तक झाले व त्यांच्या उपस्थितीत शंभूराजेंना शासकीय मानवंदना देण्यात आली.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र ही साधूसंतांची, वीरांची भूमी आहे. छत्रपती संभाजी महाराज हे देव, देश आणि धर्मासाठी लढणारे राजे होते. त्यांच्या स्मृतिस्थळाच्या विकासासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विकासकामे करताना पावित्र्य कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
दोन्ही स्थळांचा राज्याच्या लौकिकाला साजेसा विकास करण्यात येईल. या कामाला गती देऊन दर्जेदार कामे करण्याबाबत जिल्हाधिकार्यांना सूचना देण्यात आल्याचे सांगून वढू व तुळापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले की, राज्य शासन हे लोककल्याणकारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शावर चालणारे हे सरकार असून, जनकल्याणाचा संकल्प शासनाने केला आहे. गेल्या अडीच वर्षांत राज्यात अनेक विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबविल्या. तीर्थक्षेत्र, गडकोट, किल्ले यांच्या विकासाला प्राधान्य दिले. गडकोट, किल्ले हे आपले धरोहर आहेत.
गडकोट, किल्ल्यांवरील अतिक्रमणे प्राधान्याने काढण्यात येतील. गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. मुंबईतील सागरी मार्गाला धर्मरक्षक संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती गेट वे ऑफ इंडिया येथे साजरी करण्यात आली, ही अभिमानाची बाब आहे. वढू बुद्रुक गाव हे महाराष्ट्राचे ऊर्जास्थान आहे.
वढू हे स्वराज्यतीर्थ असून, या स्वराज्यतीर्थाकडून मिळणारी शक्ती एकवटून महाराष्ट्राला प्रगतिपथावर घेऊन जायचे आहे, असे सांगून गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. गोशाळेला अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आवश्यकता असल्यास गोहत्या रोखण्यासाठी आणखी कडक कायदा करण्यात येईल.
गोरक्षकांचे काम करणार्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले. तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार दरवर्षी आजच्या बलिदान दिनानिमित्त स्थानिक सुटी जाहीर करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महंत प. पू. श्रीरामगिरी महाराज यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार व रोख 51,000 रुपये देण्यात आले. आमदार महेश लांडगे यांना श्री शंभूतेज पुरस्कार, तर सुधीर बाळसराफ व महेश भुईवार यांना देखील शंभूसेवा पुरस्कार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शासकीय सुटी घोषित करण्यात यावी तसेच पहिलीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजेंचा इतिहास पाठ्यपुस्तकात चालू करावा, अशी मागणी या वेळी ग्रामस्थांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
औरंगजेब महाराष्ट्राला लागलेला कलंक: उपमुख्यमंत्री शिंदे
मी मुख्यमंत्री असताना शंभूराजांच्या स्मारकासाठी चारशे कोटी रुपये निधीची तरदूत केली. श्रीक्षेत्र तुळापूर आणि श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या शौर्याला साजेसे असे तीर्थक्षेत्र होईल. त्या स्मारकाच्या कामाला निधी कमी पडून देणार नाही, औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि त्याचे उदात्तीकरण करणारे देखील एक कलंकच आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.