बोपदेव घाट अत्याचार प्रकरण : अत्याचारानंतर आरोपींचा पुण्यातच मुक्काम

म्हणून मोबाईल टाकले फ्लाइट मोडवर
bopdev ghat rape case
बोपदेव घाट बलात्कारfile photo
Published on
Updated on

बोपदेव घाटात तरुणीवरील सामूहिक बलात्कारामुळे एकीकडे शहरात खळबळ उडाली असताना, दुसरीकडे मात्र तिघे आरोपी तीन दिवस पुण्यातच मुक्कामाला होते. अख्तर शेख (वय 27, रा. नागपूर) हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. त्यानेच तरुणीवर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केला. अत्याचार करण्यापूर्वी तिघांनी गांजा आणि मद्याचे सेवन केले होते. तिघे सराईत गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी आपले मोबाईल देखील सुरुवातीपासूनच फ्लाईट मोडवर टाकले होते. परंतु, पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून सीसीटीव्ही, आरोपीच्या अंगातील शर्ट आणि आपल्या खबर्‍यांचे नेटवर्क वापरून अखेर या गंभीर गुन्ह्याचा छडा लावला.

अख्तरला सोमवारी (दि.14) उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. तेथील स्थानिक न्यायालयात हजर करून अख्तरची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) घेऊन त्याला मंगळवारी पुण्यात आणण्यात आले आहे. वैद्यकीय चाचणीनंतर पोलिस त्याला अटक करणार आहेत. दरम्यान, यापूर्वी पोलिसांनी शुक्रवारी चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय 20, रा. डिंडोरी, रा. मध्य प्रदेश) याला अटक केली आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार अद्याप फरार आहे.

दहा दिवसांपूर्वी बोपदेव घाटात मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. सात दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शुक्रवारी पोलिसांना चंद्रकुमारचा शोध लागला होता. त्यानंतर सोमवारी अख्तरला प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वीही अख्तरवर लूटमार, बलात्कार केल्याप्रकरणी भिगवणमध्ये एक गुन्हा नोंद आहे. तर लूटमारीचे पुण्यासह, नांदेड, पुणे ग्रामीण, लातूर येथे दहा गुन्हे दाखल आहेत. त्यातील दोन गुन्हे सामूहीक बलात्काराचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. अख्तर वेगवेगळ्या साथीदारांना सोबत घेऊन निर्जनस्थळी लूटमार करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने लूटमार करताना अत्याचार देखील यापूर्वी केले असल्याचे साथीदार सांगत आहेत. परंतु, त्या घटनांची नोंद झालेली नाही. त्यामुळे तो निर्ढावला होता.

घटनेच्या दिवशी आरोपींनी आधी दारू प्यायली. त्यानंतर बराच वेळा गांजा ओढला. त्यामुळे तिघेही दारू आणि गांजाच्या नशेत होते. त्यानंतर तिघे बोपदेव घाटात गेले. दरम्यान, बोपदेव घाटात जाण्यापूर्वी त्यांनी मोबाईल फ्लाइट मोडवर टाकले होते. जेणेकरून आपले लोकेशन पोलिसांना मिळू नये. तसेच, लूटमार करतानाही ते लोकांकडील मोबाईल चोरत नव्हते. त्यामुळे पोलिसांना त्यांचा माग काढणे अवघड जात होते, तर काही घटनेच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या नाहीत. अख्तर यानेच पीडित तरुणीवर प्रथम अत्याचार केला. त्यानंतर इतर दोन आरोपींनी अत्याचार केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. अख्तर याची लग्नाची पत्नी नागपूरमध्ये आहे. तर, दोन महिलांसोबत अनैतिक संबंध असून, त्यांच्यासोबतही तो राहतो. त्या त्याच्याच मेहुण्या असल्याची माहिती आहे. त्याचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचे समजते.

7 तारखेला अख्तरने पुण्यातून काढला पळ

तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिघे आरोपी 7 ऑक्टोबरपर्यंत शहरातच वास्तव्यास होते. घरात वावरताना देखील आपण काही केले नसल्यासारखे वावरत होते. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तिघे चंद्रकुमारच्या उंड्री परिसरातील घरी एकत्र भेटले. त्यांनी याबाबत कोणी कोठे वाच्यता करायची नाही, असे ठरवले. तर फरार तिसर्‍या आरोपीचा मोबाईल अख्तरने काढून घेतला. चंद्रकुमार कोंढव्यातच राहात होता. तर सात ऑक्टोबरला अख्तरने पुणे सोडून नागपूर गाठले. पारशिवणीत तो राहण्यास गेला. त्याठिकाणी तो चार दिवस राहिला. परंतु, पोलिसांनी चंद्रकुमारला पकडल्यानंतर त्याने 11 ऑक्टोबर रोजी नागपूर सोडले आणि तो प्रयागराज येथे गेला, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

पावभाजी सेंटरचा शर्ट ठरला महत्त्वाचा

आरोपी पेट्रोलपंपावरील कॅमेर्‍यात कैद झाल्यानंतर एका लंगड्या व्यक्तीने अख्तरची माहिती पोलिसांना दिली. लंगडा देखील भिगवणच्या एका गुन्ह्यात अख्तरचा सहआरोपी आहे. त्यानंतर पोलिसांना चंद्रकुमारचा सुगावा लागला. चंद्रकुमारने अंगावर तो काम करत असलेल्या पावभाजी सेंटरच्या नावाचा शर्ट अंगावर परिधान केला होता. गुन्हे शाखेच्या दोघा अंमलदारांनी ते पावभाजी सेंटर शोधून काढले. त्यावेळी चंद्रकुमार येथे काम करत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो मी नव्हेच अशी भूमिका त्याने घेतली. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच चंद्रकुमार पोपटासारखा बोलू लागला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news