

पुणे : अमेरिकेने अखेर इराण-इस्रायल युद्धात उडी घेतली आहे. याचा सध्या तरी भारतावर परिणाम होणार नाही. मात्र, हे युद्ध अधिक काळ सुरू राहिल्यास आपल्याला दूरगामी परिणाम भोगावे लागतील. तसेच आता दोन शेजारी राष्ट्र एकमेकाला संपवण्याची भाषा करत आहेत. ही मानसिकता धोक्याची असल्याचेही मत सैन्य दलातील माजी अधिकार्यांनी व्यक्त केले.
शनिवारी रात्री अमेरिकेच्या वतीने इराणवर बॉम्ब हल्ले झाल्याने संपूर्ण जग हादरले आहे. भारत-पाकिस्तान युद्ध संपताच अमेरिकेने घेतलेले हे पाऊल म्हणजे आम्ही महासत्ता आहोत हे दाखविण्यासाठी घेतलेले पाऊल आहे, अशाच प्रतिक्रिया संरक्षण तज्ज्ञांकडून येत आहेत. काही माजी अधिकार्यांनी याबाबत दै. ‘पुढारी’ला प्रतिक्रिया देताना अनेक बाजू समजावून सांगितल्या.
निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर म्हणाले, अमेरिकेने अखेर इराण युद्धात उडी घेतली आहे. शनिवारी रात्री अमेरिकेच्या बी 2 या स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सनी शक्तिशाली बंकर बस्टर बॉम्ब इराणच्या तीन न्यूक्लिअर साईटवर डागले. या हल्ल्यामुळे इराणचे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी अमेरिकेने जगात आपले निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या हल्ल्यात अमेरिकेने पाकिस्तानची हवाई हद्द वापरल्याची देखील माहिती आहे. पाकिस्तान लष्कराचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांना त्यांनी जेवणासाठी आमंत्रण देऊन यासाठी पार्श्वभूमी तयार केली होती. याचे परिणाम आता पाकिस्तानला भोगावे लागणार आहेत. इराण आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडणार आहेत. या हल्ल्यामुळे भारतीय उपखंडावर दूरगामी परिणाम होतील. इराणने स्ट्रेट होर्मुज बंद केली तर या मार्गावरून होणार्या व्यापारावरदेखील गंभीर परिणाम होणार असून याचा फटका सर्व जगाला बसण्याची शक्यता आहे.
या संघर्षानंतर इराणचा उदय कसा होतो, ते पाहावे लागणार आहे. इराण कमजोर होतो की, आणखी शक्तिशाली होतो, यावर इराण-पाकिस्तानचे संबंध अवलंबून असले तरी त्यांच्यावर विपरीत परिणाम होतील. भारताने या संघर्षात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. भारताचे इराण आणि इस्रायल दोघांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. भारत- इस्रायलची सामरिक मैत्री बाहेर तर भारताने इराणचे बहार बंदर विकसित केले आहे. या बंदराच्या माध्यमातून भारताला व्यापार वाढवायचा आहे. त्यामुळे दोन्ही देशांशी भारताला चांगले संबंध ठेवायचे आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करून चाणक्य नीतीचा अवलंब केला आहे, असेही निंभोरकर यांनी सांगितले.
सॅटेलाईट इमेजरी तज्ज्ञ निवृत्त कर्नल विनायक भट म्हणाले, या युद्धाचा भारतावर परिणाम होणार नाही. कारण आपले संबंध दोन्ही देशांसोबत चांगले आहेत. कच्चे तेल महाग झाले तरी आपण त्यातून मार्ग काढू शकू, अशी सध्याची स्थिती आहे. मात्र, इराण काही केल्या ऐकत नव्हते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पहिल्या टर्मपासून त्यांनी इराणला हा इशारा दिला होता. मात्र इराणने ऐकायचे नाही हेच ठरवल्याने शेवटी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. भारताने यातून धडा घेण्यासारखी स्थिती आहे. कारण पाकिस्तान आपल्याशी अशीच भाषा करत आहे. बाजूला चीन देखील अणुशक्तीने प्रचंड शक्तिशाली झाला आहे.
निवृृत्त ब्रिगेडियर श्रीनिवास अंबिके म्हणाले की, भारताला या युद्धाचा थेट फटका बसणार नाही. कारण आपल्या देशाची विदेश नीती सध्याच्या राजकीय स्थितीमुळे चांगली दिसत आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावे लागेल. तसेच परराष्ट्रमंत्रीसुद्धा कणखर भूमिका घेत आहेत. त्यामुळे या युद्धाचा थेट परिणाम भारतावर होईल, असे मला वाटत नाही.