Bailgada Sharyat News: निंबूतला विनापरवाना बैलगाडा शर्यत; आठ जणांवर गुन्हा
बारामती : प्रशासनाची परवानगी न घेता बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत तेथे जमलेल्या लोकांच्या जीविताला व सुरक्षिततेला धोका पोहोचेल, असे कृत्य केल्याप्रकरणी निंबूत (ता. बारामती) येथील आठ जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. 29) रोजी घडली.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी नीलेश चंद्रकांत जाधव यांनी फिर्याद दिली. ओंकार प्रदीप काकडे, राजेंद्र बाबूराव काकडे, हर्षवर्धन चंद्रशेखर जगताप-काकडे, सुजित सर्जेराव काकडे, रोहित गोंडे, राजवर्धन चंद्रशेखर काकडे, सार्थक काकडे व ओकार गोंडे (सर्व रा. निंबूत, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी हे करंजेपूल दूरक्षेत्र येथे कर्तव्यावर हजर असताना पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. निंबूत गावच्या हद्दीत निरा-मोरगाव रस्त्यालगत पठारावर ओंकार काकडे व इतर आयोजक साथीदारांनी सतीश टेंगले यांच्या मालकीच्या जमीन गट क्रमांक 225 मध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. त्यासाठी पोलिस ठाण्याची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. शर्यतीसाठी येथे अनेक बैलगाडा मालक, चालक त्यांच्या बैलगाड्यासह आले होते. शर्यत पाहण्यासाठी अनेक लोक जमा झाले होते. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक साबळे, हवालदार अमोल भोसले, हवालदार कडवळे हे घटनास्थळी गेले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रशासनाची परवानगी घेतली आहे का, अशी विचारपूस केली. त्या ठिकाणी कोणीही वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. शर्यतीच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेट्स अथवा अन्य उपाय करण्यात आले नव्हते. बैलगाडा शर्यती सुरू होत्या. मोठ्याने आरडाओरडा केला जात होता. बैलगाडा शर्यतीवरून तेथे वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता होती. पोलिसांनी सांगितल्यानंतरही या शर्यती सुरूच ठेवण्यात आल्या. त्यामुळे पोलिसांनी विनापरवाना आयोजनाबद्दल आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

