दुर्दैवी : अपघातात तरुणाचा मृत्यू ,दोघे जखमी
मंचर : पुढारी वृत्तसेवा : यात्रा करून घरी परतत असलेल्या दुचाकीस्वारांना वाहनाने धडक दिल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. इतर दोन जण जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 8) पहाटे मंचरजवळील भोरमळा तांबडेमळा गावच्या हद्दीत घडली. प्रमोद नवनाथ इंदोरे (वय 19) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. यश अनिल शिंदे, जयेश बाळू शिंदे (सर्व रा. अवसरी खुर्द, इंदोरेवाडी, ता. आंबेगाव) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद इंदोरे, यश शिंदे, जयेश शिंदे हे गुळानी (ता. खेड) येथील यात्रेसाठी दुचाकी (एमएच 14 डीजेड 1581) वरून गेले होते. रात्री घरी येत असताना सोमवारी पहाटे नाशिक महामागार्वरील भोरवाडी तांबडे मळा गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. त्यात प्रमोद इंदोरे याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तो मृ्त्यू पावल्याचे सांगितले. याबाबत मनोज इंदोरे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फियार्द दिली आहे.
सेवा रस्त्याअभावी अपघात
तांबडेमळा अवसरी ग्रामपंचायत हद्दीतील अनेक ग्रामस्थ सेवा रस्ता नसल्याने विरुद्ध दिशेने प्रवास करतात. तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग अधिक असतो. त्यामुळे अपघात घडत आहेत. यापूर्वी माळवस्ती ते शिवनेरी मिसळ असा सेवा रस्ता करण्याची मागणी ग्रामपंचायतीने अनेकदा केली. परंतु, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. अपघात टाळण्यासाठी सेवा रस्ता होणे गरजेचे आहे, असे तांबडे मळाच्या सरपंच प्राजक्ता विजय तांबडे यांनी सांगितले.
हेही वाचा

