

इंदापूर: जळगाव येथे जो प्रकार घडला तो अत्यंत खेदजनक आणि निंदनीय आहे. त्यापेक्षा दुर्दैवाची बाब म्हणजे केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या मुलीच्या संदर्भात पोलिस ठाण्यात जावं लागतं आहे. या घटनेची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबतीत गृहखात्याने अधिक लक्ष घालावे. पोलिस वर्दीचा वचक, दरारा असायला हवा, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारचे कान टोचले.
सोमवारी (दि. 3) इंदापूर बसस्थानकाला भेट दिल्यानंतर पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, सार्वजनिक जीवनात काम करताना प्रत्येकाने काही पथ्य पाळले पाहिजे. सामाजिक भान ठेवले पाहिजे, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
बीड आणि परभणीत घडलेल्या घटना खेदजनक आणि निंदनीय आहेत. अधिवेशनात हे विषय चर्चिले जातील. परंतु महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या राज्यात अशा घटना घडल्यानंतर प्रत्येकाने आपली नैतिकता तपासून घ्यावी. आम्ही 20 वर्षे मंत्रिमंडळात होतो. अशा काही घटना घडल्यानंतर तत्काळ त्यावेळच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांनी काय करावा हा त्यांचा प्रश्न आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
सत्ताधार्यांना आश्वासनांचा विसर पडू नये
सोमवारी राज्यपालांचे अभिभाषण झाले. लवकरच अर्थसंकल्प मांडणार आहेत. शेतकर्यांची कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेचे पैसे यांचा त्यामध्ये समावेश होता. या सर्वांचं काय होतंय ते बघूया, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी अर्थसंकल्पावरून दिली आहे.
योगेश कदम यांच्या वक्तव्याचा निषेध
योगेश कदम यांच्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. सरकारमधील एखाद्या मंत्र्याने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे चुकीचे आहे. त्याचा खुलासा त्यांनी केला. खुलासा करणे हा भाग वेगळा पण असं वक्तव्यच करायला नको होतं. अशा संवेदनशिल घटनेत काय बोलावं, यापेक्षा काय बोलू नये याचं तारतम्य ठेवलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे, असं म्हणत पाटील यांनी योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला.