अनधिकृत नळजोड होणार अधिकृत

महापालिकेचा अभय योजनेचा प्रस्ताव
Abhay Yojana to be implemented by the Municipal Corporation
महापालिकेची अभय योजना File Photo

पुणे : शहरातील अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी महापालिका आता अभय योजना आणणार आहे. विशेष म्हणजे नवीन नळजोडांसाठी कागदपत्रांची संख्या 50 टक्के कमी करून आता फक्त पाच कागदपत्रांच्या आधारे नळजोड दिले जाणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्यातील विस्कळीत-पणा दूर होण्यास मदत होणार आहे.

महापालिकेच्या प्राथमिक अंदाजानुसार शहरात साडेचार ते पाच लाख अनधिकृत नळजोड आहेत. प्रामुख्याने महापालिकेकडून नळजोड देताना अवास्तव कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यामुळे नागरिक थेट अनधिकृत नळजोड घेऊन पाण्याची चोरी करतात. त्यामुळे अशा नागरिकांना पाणीपुरवठा होतोच, परंतु कुठलीही नोंद नसल्याने पालिकेचा महसूल बुडतो. तसेच, अनधिकृत नळजोडांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होतो.

इतर नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यावर तोडगा म्हणून महापालिकेने शहराच्या हद्दीतील नळजोड अधिकृत करण्यासाठी अभय योजना प्रस्तावित केली आहे. त्यानुसार कमीत कमी कागदपत्रांमध्ये नळजोड अधिकृत होणार आहेत. मात्र, नळजोड दिला म्हणजे संबंधित बांधकाम अधिकृत होणार नाही, असे हमीपत्र पाणीपुरवठा विभागाकडून घेतले जाणार आहे.

आता द्यावी लागणारी कागदपत्रे

मालकी हक्काची कागदपत्रे, अद्ययावत टॅक्स भरल्याची कागदपत्रे, आधार कार्ड प्रत, बांधकाम भोगवटा पत्र (उपलब्ध असल्यास), पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सदरचा नळजोड दिला म्हणजे बांधकाम अधिकृत होते, असे नाही. याबाबतचे हमीपत्र अशीच पाच कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.

याआधी द्यावी लागत असलेली कागदपत्रे

नळजोडसाठीच्या अर्जासमवेत मालकी हक्काची कागदपत्रे, मान्य नकाशा, कॉलनी वॉटर लाइन डेव्हलपमेंट सर्टिफिकेट, भोगवटापत्र, पूर्वीचा नळजोड असल्यास नळजोडचे बिल भरल्याची कागदपत्रे, मालकाचे नाव व पत्ता कागदपत्रे, संपर्कासाठी मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, लायसन्स प्लंबरचा वैध दाखला, जिथे नळजोड घेणार आहे, तेथील नकाशा व त्यावर अर्जदार यांची स्वाक्षरी, हमीपत्र शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून द्यावे लागत होते.

उपनगरांना होणार फायदा

महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये, 11 गावांमध्ये व जुन्या हद्दीमध्ये भोगवटापत्ेवारी दाखला न घेतलेल्या बांधकामांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या बांधकाम धारकांकडून कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने अनधिकृतपणे नळजोड घेण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या गावांमधील नागरिकांसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news