अमृत भांडवलकर
सासवड : पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे येथील जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. सासवड, जेजुरी शहराच्या चारही बाजूंच्या 10 ते 15 किलोमीटर अंतरावरील ग्रामपंचायत हद्दीत जोर धरलेले प्लॉटिंग धडाक्यात विकण्याचा प्रकार सुरू असल्याने कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा धोका निर्माण झाला आहे. परंतु मोठ्या राजकीय दबावामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. (Pune News Update)
सासवड परिसरातील गावांच्या हद्दीत जमिनीचे रहिवास अथवा इतर कारणांकरिता विकसित करण्यासाठी संबंधित जागेचे रेखांकन मंजूर करणे, संबंधित जमिनीच्या अकृषिक वापरासाठी परवानगी घेणे आणि त्यानंतर जमिनीवर विकास करणे अपेक्षित असते. सासवड शहरात मूळ मालकांच्या वादात मोठ्या राजकीय नेत्यांनी व भूमाफियांनी ’प्लॉटिंग’ सुरू केले असून, हे ’प्लॉट’ खरेदी करणार्या शेकडो ग्राहकांना भविष्यात कोट्यवधी रुपयांना चुना लागणार आहे हे नक्की. तरीदेखील या प्रकारापासून त्यांना अनभिज्ञ ठेवून प्रतिगुंठा 25 ते 30 लाख रुपये घेऊन प्लॉट ग्राहकांच्या गळ्यात मारण्यात येत आहेत.
ग्राहक या वादाच्या भूखंडावर आपली आयुष्यभराची कमाई दावणीला लावत आहेत. मूळ मालकात जमिनीच्या मालकी हक्कावरून महसूल विभागात वादविवाद चालू असल्याचे समजते.
सासवड भागातील प्लॉटिंग दलालांनी प्रशासनातील अनेकांना हाताशी धरून ओढ्यालगत जमीन, डोंगर, टेकड्या, वादावादी व वतनी, इनामी जमिनींचे प्लॉटिंग चालविले आहे. अशिक्षित व गोरगरीब शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने लाटून तो प्लॉट चौपट, पाचपट दराने बेकायदेशीरपणे विक्री केली जात आहे आणि या दलालांना महसूल विभागातील मंडळीदेखील लालसेपोटी कायद्यातील पळवाटा दाखवत अशा नोंदी सातबारावर घेत आहेत.