

आळंदीनजीक असलेल्या डुडुळगाव भागातील इंद्रायणी नदीपात्रात वेदश्री तपोवनचे दोन साधक विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या मुलांचा शोध सुरू असल्याची माहिती आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
ही मुले १२ ते १६ वर्षाच्या वयोगटातील असून श्रावण पूजननिमित्त नदी पूजनासाठी हे सर्व विद्यार्थी इंद्रायणी नदीच्या डूडूळगाव येथील नदीकाठावर गेले होते. यावेळी नदीत उतरलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी वाहत जाऊ लागल्याने त्यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या विद्यार्थ्यांने नदीत उडी घेतली; मात्र त्याला एकाला वाचविण्यात यश आले पण तो स्वतःच यात बुडाला. हे विद्यार्थी घाबरलेले असून निश्चित किती जण बुडाले याचा आकडा सांगता येत नसून अंदाजे दोन विद्यार्थी बुडाल्याचे सांगितले जात आहे
आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक दल, दिघी पोलीस स्टेशन आळंदी पोलीस स्टेशन या बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या शोधकार्यात लागलेले आहे.
धक्कादायक म्हणजे इंद्रायणीच्या डूडुळगाव नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झालेला असून या ठिकाणचे नदीपात्र धोकादायक बनलेले आहे त्याच ठिकाणी हे विद्यार्थी श्रावण पूजेकरता गेल्यामुळे हा अनुचित प्रकार घडला आहे.