

उरुळी कांचन: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात समाज माध्यमात आक्षेपार्ह, अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी सोरतापवाडी (ता. हवेली) येथे आश्रय घेतलेल्या एका संशयिताला मुंबई सायबर ब्रँचच्या दक्षिण पथकाने अटक केली. मंगळवारी (दि. 12) रात्री उशिरा अल्ट्राटेक कंपनीकडे जाणार्या एका मंगल कार्यालयाजवळून पोलिसांनी त्याला अटक केली.
आकाश डाळवे (वय 30) याला मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले . तर अविनाश पुकळे (वय 30) याला उरळी कांचन, जि. पुणे येथून अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना आज गिरगाव येथील 18 व्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात फेसबुकवरील एका पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. या घटनेचा तपास करीत असताना संशयित अविनाश पुकळे याने सोरतापवाडीत आश्रय घेतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
गुन्हेगारांना आश्रय देणार्यांना सहआरोपी करा
उरुळी कांचन परिसर हा कुख्यात गुन्हेगारांचा अड्डा राहिला आहे. या परिसरात नामचिन गुंडाची गुन्हेगारी संपली. मात्र, गुन्हेगारी कारवाया करणार्या जिल्हा व जिल्ह्याबाहेरील गुन्हेगार मंडळींना मात्र या ठिकाणी आश्रय मिळत असल्याची परिस्थिती आहे. गुन्हेगारांना या ठिकाणी आश्रय मिळून सल्लागाराची भूमिका काही गुन्हेगार करीत आले आहेत. त्यामुळे राजाश्रय देणार्यांची पाळेमुळे उखडून अशा स्थानिक गुन्हेगारांवर पोलिसांनी करडी नजर ठेवून त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी होत आहे.