पुण्यातील कल्याणीनगर भागात भागात झालेल्या पॉर्शे अपघात प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली आहे. ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदली प्रकरणात आणखी दोघांना अटक केली आहे. आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अपघातास कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, आई शिवानी विशाल अगरवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब—ह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड हे सध्या येरवडा कारागृहात आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपींनी गुन्हा घडल्याच्या पहिल्याच दिवशी कागदपत्रांसह पुराव्यामध्ये छेडछाड करण्याबरोबरच नवीन पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाला योग्य तो निर्णय देण्यासाठी कायद्यानुसार पुरावा लागतो. त्यामुळे न्याययंत्रणेशीच केलेला हा खेळ आहे. न्याययंत्रणेशी खेळणे हे अतिशय गंभीरतेने घेतले पाहिजे, असा युक्तिवाद कल्याणीनगर अपघात प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केलेला आहे.