

पुणे : भूमिअभिलेख विभागातील शिरस्तेदार,भूकरमापक, परिरक्षण भूकरमापक यांनी वेतनवाढीसह विविध मागण्यासाठी गेल्या बारा दिवसांपासून सुरू केलेला संप तोडगा न निघाल्यामुळे अजुनही सुरूच आहे. दरम्यान पुणे प्रदेश विभागातील कर्मचा-यांनी सुरू केलेल्या संपाबरोबरच आता अमरावती आणि नागपूर या विभागातील भूमिअभिलेख विभागातील संघटनांनी देखील आता याच मागण्यांसाठी बेमुद्त संप सुरू केला आहे. या संपामुळे राज्यातील सर्वच विभागातील मोजण्यांसह इतर कामे खोळबली आहेत. दरम्यान महसूल मंत्र्यांशी चर्चा होणे गरजेचे आहे. असे संघटनेचे अध्यक्ष विजय पिसाळ, सरचिटणीस अजित लांडे, कोषाध्यक्ष सोमनाथ कोरके, उपाध्यक्ष सतिश बाठे यांनी सांगितले.
भूमिअभिलेख विभागाच्या पुणे प्रदेश विभागातील महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्यावतीने वेतनवाढी बरोबरच इतर प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी बेमुद्त संप सुरू केला आहे या संपात राज्यातील इतरही संंघटना सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे आता संपाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत माहिती देताना संघटनेचे सरचिटणीस अजित लांडे म्हणाले,“ वन विभाग, एम. आय. डी.सी. महापालिका विभागात कार्यरत असलेले भूकरमापक यांना आमच्या विभागात कार्यरत असलेल्या भूकरमापकांच्या वेतनात खूपच तफावत आहे.त्याचप्रमाणे सन 2015 मध्ये तत्कालीन प्रधान सचिव यांच्याशी वेतनवाढीबाबत संघटनेच्या पदाधिका-यांची चर्चा झाली होती .त्यावेळी त्यांनी जमाबंदी विभागाकडून वेतन वाढीचा प्रस्ताव मागितला होता. तो प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला होता. मात्र त्यावर अजुनहे निर्णय झालेला नाही. ही बाब लक्षात घेऊनच वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी बेमुद्त संप पुकारण्यात आलेला आहे.