वडगाव मावळ: धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ हेच वचन मनात ठेवूनन मनात ठेवून टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबा तुकोबांचा नामघोष करीत हजारोंच्या उपस्थितीत देहू ते भंडारा डोंगर मार्गावर दिंडी सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले. दरम्यान, रविवारपासून (दि. 9) सुरू होणार्या जगद्गुरु संत तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्याचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला.
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या 16 मार्च रोजी अर्थात तुकाराम बिजेच्या दिवशी 375 वर्षे पूर्ण होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू हभप मारुतीबाबा कुर्हेकर महाराज आणि वारकरीरत्न हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या नेतृत्त्वाने भंडारा डोंगराच्या पायथ्याला गाथा पारायण सोहळा 9 ते 17 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
पालखीत 5 किलो चांदीच्या पादुका
या सोहळ्याची सुरुवात आज श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर अशा भव्य दिंडी सोहळ्याने करण्यात आली. जगद्गुरू तुकोबारायांच्या पाच किलो चांदीच्या पादुकांची देहू येथील मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पादुका सजविलेल्या पालखीत ठेवून टाळ-मृदंगाच्या आणि ज्ञानोबा तुकाराम या नामघोषात मंदिराबाहेर आणण्यात आल्या. पालखीसमोर दोन शुभ्र अश्व होते. मंदिराबाहेर महिला डोक्यावर कलश आणि तुळसी वृंदावन घेऊन उभ्या होत्या. नंतर पालखी सजविलेल्या रथात ठेवली गेली. रथाला महेंद्र बाळकृष्ण झिंझुर्डे यांची अत्यंत देखणी खिलारी बैलजोडी होती.
पालखीसोबत माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे यांनीही पालखीला भेट देऊन दर्शन घेतले. भंडारा डोंगर मंदिर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली), देहू संस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त पुरुषोत्तममहाराज मोरे, महोत्सव समितीचे अध्यक्ष निवृत्ती आबा कोळेकर, आप्पासाहेब बागल, काळुराम मालपोटे, जोपाशेट पवार, जगन्नाथ नाटक आदींसह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगद्गुरू तुकोबारायांच्या पाच किलो चांदीच्या पादुकांची शांतीब्रह्म गुरुवर्य हभप मारोतीमहाराज कुर्हेकर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या वेळी हभप गुरुवर्य डॉ. नारायण महाराज जाधव यांनी शुभाशीर्वाद दिले. त्यानंतर कुर्हेकर महाराजांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन त्यांच्या आशीर्वचनाने सोहळ्याची सुरुवात झाली.
375 धर्मध्वजधारी सहभागी
संत तुकाराम महाराजांच्या पाच किलो चांदीच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येकी 375 धर्मध्वजधारी, कलशधारी, तुळसीधारी, कीर्तनकार, टाळकरी, मृदंग सेवक, ब्रह्मविणाधारी व तुकाराम नाव असलेले चोपदार सहभागी झाले होते. जन्मभूमी देहू ते तपोभूमी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर या मार्गावर जणू भक्तीचा अभंग तुकाराम सेतू उभारला गेला आहेे. ज्या मार्गाने तुकोबाराय नामस्मरण करत ध्यानासाठी भंडारा डोंगरावर जात त्याच मार्गाने आज हजारो वारकरी दिंडी सोहळा घेऊन जाताना तुकोबारायांची अध्यात्मिक श्रीमंती दिसून येत होती.