रमेश कांबळे
देहूगाव: जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठगमन सोहळा ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात, टाळ-मृदंगांच्या गजरात नांदुरकीच्या वृक्षावर फुलांचा वर्षाव करीत देहूनगरीत दाखल झालेल्या लाखो वैष्णवांच्या मेळ्याने ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला.
ठीक बारा वाजता ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम’चा गजर करीत नांदुरकीच्या वृक्षावर पानं-फुलं, तुळशीपत्रांचा वर्षाव करून या 375व्या वैकुंठगमन सोहळा रविवारी (दि. 16) अनुभवला. या वेळी संपूर्ण देहूनगरी लाखो वारकरी, भाविक, भक्तांच्या उपस्थितीने फुलून गेली होती.
जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळा अनुभवण्यासाठी रविवारी राज्याच्या कानाकोपर्यांतून वारकरी, भाविक, भक्त तसेच दिंड्या ‘धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव। तेथे नांदे देव पांडुरंग॥ धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे। उच्चरीती याचे नामघोष ॥’ या संत तुकोबांच्या अभंगाप्रमाणे अर्थात हजारो-लाखो वैष्णवांचा मेळा या पवित्र अशा श्रीक्षेत्र देहूनगरीत दाखल झाला होता.
देहू देवस्थान संस्थानच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरात पहाटे 3 वाजता काकड आरती करण्यात आली. पहाटे 4 वाजता संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि वारकरी यांच्या हस्ते श्रींची महापूजा आणि शिळा मंदिरात महापूजा करण्यात आली.
सकाळी साडेदहा वाजता पाना-फुलांनी सजवलेल्या पालखीत संत तुकोबांच्या पादुका ठेवण्यात आल्या. त्यानंतर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामच्या गजरात हजारो वारकरी, भाविक, भक्तांच्यासह पालखी मुख्य मंदिरातून बाहेर आली. या पालखीचे संत तुकाराम महाराज वैकुंठस्थान मंदिर या ठिकाणी आगमन झाले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375व्या वैकुंठगमन सोहळा अनुभवण्यासाठी देहूत इंद्रायणीकाठी, मैदाने, सोसायट्या, विविध मंदिरांमध्ये बीज सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दररोज हरिपाठ, पारायण, भजन, कीर्तन असे कार्यक्रम झाले. त्यामुळे संपूर्ण देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. तर, टाळ-मृदंग व हरिनामाच्या गजराने अवघी देहूनगरी दुमदुमून गेली होती.