

नारायणगाव: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथे शुक्रवारी (दि. 18) सकाळी झालेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आयशर मालट्रकचालक रोहित कुमार जगमालसिंग चौधरी (वय 30) व नाशिक-महाबळेश्वर या एसटीचे बसचालक भाऊसाहेब भास्कर जायभाई (वय 40) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
या दोघांना शनिवारी (दि. 19) जुन्नर न्यायालयात हजर केले असता मालट्रकचालक रोहित कुमार जगमालसिंग याला तीन दिवसांची पोलिस कोठडी, तर एसटी बसचालक भाऊसाहेब जायभाई याला न्यायालयीन कोठडी दिली असून, त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, अपघातातील दोन गंभीर जखमीची प्रकृती चिंताजनक असून, इतर जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक शेलार यांनी दिली.
पुणे-नाशिक महामार्गावर येथील मुक्ताई ढाब्याजवळ प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो व्हॅन, मालवाहतूक आयशर टेम्पो व एसटी बस या तीन वाहनांमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला होता. या अपघातात मॅक्झिमो व्हॅनच्या चालकासह नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आठ प्रवासी जखमी झाले होते. यापैकी तस्लीम वसीम इनामदार (वय 30) आणि गणपत बजाबा घाडगे (वय 52 ) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.