वाहतुकीचा वेग 10.5 टक्क्यांनी वाढला तर कोंडीचे प्रमाण 53 टक्क्यांनी घटले

पोलिसांकडून विश्लेषनात्मक अभ्यास करून प्रभावी उपाययोजना लागू
Pune News
वाहतुकीचा वेग 10.5 टक्क्यांनी वाढला तर कोंडीचे प्रमाण 53 टक्क्यांनी घटलेPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग 10.5 टक्क्यांनी वाढला असून, वाहतूक कोंडीचे प्रमाण देखील 53 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे. वाहतूक कोंडीत आघाडीवर असलेल्या पुणे शहरात प्रथमच पोलिसांकडून विश्लेषनात्मक अभ्यास करून सप्टेंबर 2024 पासून प्रभावी उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान, वाहतूक विभागाने त्यासाठी 59 ठिकाणी रस्त्यावर प्रमुख बदल केले, तर सिग्नल सिंक्रोनायझेशन, वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण, पार्किंगव्यवस्था, वाहतूक कोंडीच्या कारणांचा शोध, विशेष मोहिमेंंतर्गत कारवाई आदींमुळे हे शक्य झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी, पोलिस निरीक्षक सुनील गवळी आदी उपस्थित होते.

वाहतूक कोंडी ही पुणे शहरातील एक प्रमुख समस्या आहे. अरुंद रस्ते, रस्त्यांची परिस्थिती, अतिक्रमण या कारणांमुळे अनेक भागांत कोंडी होते. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिस व महापालिका एकत्रित काम करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांनी शहरातील नगर रस्ता, सोलापूर रस्त्यांवर विविध उपाययोजना करून त्या यशस्वी करून दाखविल्या आहेत. या माध्यमातून सध्या या दोन्ही प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढला आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांचा देखील आढावा घेऊन वाहतूक पोलिसांनी उपाययोजना केल्या. 265 किलोमीटरच्या एकूण 33 प्रमुख रस्त्यांची निश्चिती करून या रस्त्यांच्या सुधारणांसाठी वाहतूक पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये वाहतूक अभियांत्रिकी बदल, तंत्रशुद्ध पद्धतीने

व्हेईकल काउंटच्या आधारे राइट टर्न, लेफ्ट टर्न बंद किंवा सुरू करणे, बॉटल नेक दूर करणे, वाहतूक अडथळा ठरणारे पीएमपीएल थांबे हलविणे, खासगी बस, रिक्षा स्थानके स्थलांतरीत करण्यासह इतर उपाययोजना केल्या. त्यामुळे या रस्त्यांवर वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत झाल्याचे दिसून आले आहे.

वाहने बंद पडल्याने सर्वाधिक कोंडी

वाहतूक पोलिसांनी 3 महिन्यांचा शहाराचा आढावा घेतला. त्यात सर्वाधिक कोंडी वाहने रस्त्यावर बंद पडल्याने झाल्याचे दिसून आले. 3 महिन्यांत तब्बल 114 वेळा वाहने बंद पडल्याने संबंधित ठिकाणी कोंडी झाली, तर बेशिस्त वाहन लावणे, चालविणे, खड्डे, अपघात, रस्त्यांची कामे, वेगवेगळे कार्यक्रम तसेच सिग्नल बंद पडण्याच्या घटनांमुळे देखील कोंडी होत असल्याचे समोर आले आहे.

वाहतूक कोंडीच्या कारणांचा शोध

सध्या वाहतूक कोंडी म्हणजे वाहतूक पोलिसांसाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्यासारखे गृहीत धरले जात आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत शहरात 428 वेळा वाहतूक कोंडी झाली आहे. त्या अनुषंगाने शहरात दिवसभरात कोणकोणत्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, याचा आढावा घेतला जातो.

त्या ठिकाणी वाहतूक कर्मचारी होते का? हे पाहिले जाते. वाहतूक कर्मचारी तिथे असतानाही वाहतूक कोंडी कशी झाली? याची कारणे शोधली जातात. या सर्व प्रक्रियेवर सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍याचे नियंत्रण असते. चौकात काम करणार्‍या कर्मचार्‍याकडून वाहतूक कोंडीचा खुलासा घेतला जातो.

त्यानंतर तेथील कोंडी कमी करण्यासाठी काय उपायोजना करता येतील? हे पाहिले जाते. तसेच काहीवेळा अचानक जास्तीच्या वाहन प्रवाहामुळे कोंडी होते. तर, काहीवेळा नागरिकांच्या चुका, वाहने रस्त्यांवर बंद पडणे, रस्त्यांवर वाहतूक पोलिस नसणे आदींमुळे कोंडी होत असल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news