सुषमा नेहरकर-शिंदे
राजगुरुनगर : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण येथील आंबेठाण चौक, चाकण, आळंदी फाटा, वासुली फाटा, चिंबळी फाटा ते थेट मोशीपर्यंत दररोज दोन-तीन-चार तासांची वाहतूक कोंडी होत आहे. चाकणपासून राजगुरुनगर, आंबेगाव, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर ते थेट नाशिकपर्यंत नियमित प्रवास करणारे प्रवासी हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीमुळे चाकण औद्योगिक वसाहतीच्या विकासाला तर खीळ बसली आहेच; आता याचा परिणाम संपूर्ण उत्तर पुणे जिल्हा, संगमनेर, नाशिकपर्यंत होत आहे. परंतु, हा अतिप्रचंड गंभीर विषय असूनदेखील याकडे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, राज्य व केंद्र शासन दुर्लक्षच करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून चाकण वाहतूक कोंडीचा प्रश्न गाजत आहे. गेल्या एक-दोन वर्षांत हा विषय चव्हाट्यावर आला आहे. हा प्रश्न आता हाताबाहेर गेला आहे. याकडे अतितत्काळ लक्ष दिले नाही, तर स्थानिक लोकांचा उद्रेक होऊन गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. राज्यातीलच नाही, तर देशातील महामार्गांपैकी चाकण- नाशिक, चाकण-तळेगाव आणि चाकण-शिक्रापूर हे महामार्ग सर्वाधिक वाहनांची संख्या असणारे महामार्ग आहेत. या महामार्गांवर दररोज सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे, कामगारांचे अपघात होत आहेत.
पोलिसांनी चाकण, तळेगाव, शिक्रापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. अनेकवेळा वाहतूक पोलिस, स्थानिक प्रशासनाचे पावत्या फाडणे, वाहनांवर कारवाई करणे, यावर अधिक लक्ष दिले जाते. याचा थेट परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. रस्त्यावर पोलिस यंत्रणा असूनदेखील वाहतूक सुरळीत होताना दिसत नाही. याशिवाय इतरही उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
बाबाजी काळे, आमदार, खेड-आळंदी
अनेकांचे जीव जात आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह राजगुरुनगरलगतच्या परिसरातून या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये कामगार, अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक यांना कंपन्यांत वेळेवर पोहचता येत नाही. कंपनीतून घरी जातानासुद्धा वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास आता केवळ स्थानिक लोकांपुरता राहिला नसून, या वाहतूक कोंडींचा परिणाम संपूर्ण उत्तर पुणे जिल्हा, संगमनेर, नाशिकपर्यंत प्रवास करणार्या सर्वांवरच होत आहे.
चाकण वाहतूक कोंडीचा थेट परिणाम येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांवर होत आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नियमित बैठका घेतल्या जातात, उद्योजकांना आश्वासने दिली जातात. परंतु, प्रत्यक्ष कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. वाहतूक कोंडीमुळे येथील विकास ठप्प होत चालला असून, भविष्यात खूप गंभीर परिणाम होऊ शकतात.
अनिकेत खालकर, युवा उद्योजक, चाकण