

चाकण : पावसाने निसरड्या झालेल्या रस्त्यावर अवजड वाहने उलटण्याचे प्रकार चाकण-शिक्रापूर रस्त्यावर होत आहेत. लागोपाठ कंटेनर उलटून वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे. मंगळवारी (दि. 16) साबळेवाडी (ता. खेड) येथील धोकादायक वळणावर पुन्हा एक कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या रस्त्याचे काम कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चाकण एमआयडीसी आणि मुंबई ते मराठवाड्याची सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेल्या चाकण ते शिक्रापूर रस्त्यावर वाहतूक कोंडीने वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनांमुळे या मार्गावर तब्बल 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. मागील 2 ते 3 दिवसांत रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर अनेक वाहने कोंडीत अडकून पडली होती.
वाहतूक कोंडी फोडताना चाकण वाहतूक विभागाची चांगलीच कसरत होत आहे. वाहनचालक विशेषतः अवजड वाहनचालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहने चालवून मोठी वाहतूक कोंडी व अपघातांना निमंत्रण देत आहेत. वाहतूक कोंडीला आळा बसावा याकरिता मोठ्या रहदारीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांना या मार्गावर प्रवेश करण्यास बंदी करण्याची गरज आहे.
वडगाव-तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महामार्गावरील अवजड वाहतूक आहोरात्र सुरू असते. तास-दोन तास जरी अपघातानंतर वाहतूक थांबली तरी 2 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. दरम्यान, शेलपिंपळगाव येथील नदीवरील 50 वर्षांहून अधिक जुना पूल धोकादायक झाला आहे. पुलाच्या रस्त्याचे काम होईपर्यंत वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठीच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांसह वाहनचालक, प्रवासी करत आहेत.