

पुणे: शहरातील सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असणार्या टॉप फाइव्हमधील मेट्रो स्थानकांची नावे नुकतीच महामेट्रो प्रशासनाने जाहीर केली आहेत. यात स्वारगेट, पीसीएमसी, रामवाडी, मंडई आणि पुणे रेल्वे स्थानक मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या पाचही स्थानकांवरून इतर स्थानकांच्या तुलनेत सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.
मेट्रोची सेवा शहरातील दोन लाइनवर (पर्पल, अॅक्वा) सुरू केली आहे. या दोन्ही लाइनवर तब्बल 30 स्थानके आहेत. यातील 05 स्थानके भूमिगत आहेत. आगामी काळात अजूनही मेट्रोच्या मार्गिकांचा विस्तार होणार आहे, तर आणखी काही नवीन मार्गिका सुरू करण्याचेही नियोजन मेट्रो प्रशासनाने केले आहे.
सध्या असलेल्या दोन मार्गिकांची लांबी 33.1 कि.मी. इतकी आहे. यावर 30 स्थानके आहेत. त्या स्थानकांतून प्रवासी प्रवास करतात. यातील 05 मेट्रो स्थानकांमधून सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असल्याची नोंद महामेट्रोने केली आहे.
मेट्रो प्रवास तिकिटात विकेंडला मिळणार 30 टक्के सवलत
विकेंडला घराबाहेर पडणार्या आणि मेट्रोने प्रवास करणार्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण महामेट्रो प्रशासनाकडून विकेंडला म्हणजेच शनिवारी, रविवारी आता मेट्रो प्रवासात 30 टक्के सवलत देण्यात आली आहे. या सेवेचा पुणेकर प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मेट्रोला पुणेकर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरूवातीला मेट्रो प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांना मेट्रोतून प्रवास करताना तिकीटामध्ये 30 टक्के सवलत दिली होती. त्यानंतर आता शनिवार, रविवारी म्हणजेच विकेंडला मेट्रोने प्रवास करणार्या सर्व प्रवाशांना तिकीटामध्ये 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मेट्रो प्रवाशांमध्ये आणखी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.