परिंचे: श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे मान्सूनपूर्व पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उन्हाळी हंगामात घेतले जाणारे टोमॅटो पीक हमखास फायदा देणारे मानले जाते.
त्यामुळे अनेक शेतकर्यांनी एप्रिल-मे महिन्यात मोठ्या आशेने टोमॅटोची लागवड केली होती. यंदाही प्रगतशील शेतकरी प्रताप, सतीश व किरण धुमाळ या तिघांनी प्रत्येकी दोन एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. (Latest Pune News)
शेतीची संपूर्ण मशागत, जैविक खतांचा वापर, पाणी व्यवस्थापन, मल्चिंग अशा पद्धतीने प्रत्येकी चार ते साडेचार लाख रुपये खर्चून उत्पादन घेतले होते. तीन ते साडेतीन हजार क्रेट्स उत्पादन मिळण्याचा अंदाज असताना मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकर्यांच्या अपेक्षांवर विरजण पडले. दुसर्या तोडणीपूर्वीच पावसाने जोर धरल्याने पिकलेले टोमॅटो कुजले, फळांना तडे गेले आणि संपूर्ण प्लॉटचा नाश झाला.
सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे वैयक्तिक नुकसान झाल्याची माहिती धुमाळ कुटुंबीयांनी दिली. शासनाकडून अद्याप तुटपुंजी मदतच मिळते, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने या नुकसानीचे गांभीर्य ओळखून तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी पीडित शेतकर्यांनी केली आहे.