Vijay Shivtare : टोल व्यवस्थापन आणि पीएमपीएमएल वादात शिवतारेंची यशस्वी शिष्टाई, बससेवा पूर्ववत होणार

Vijay Shivtare : टोल व्यवस्थापन आणि पीएमपीएमएल वादात शिवतारेंची यशस्वी शिष्टाई, बससेवा पूर्ववत होणार
Published on
Updated on

सासवड : पुणे-सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोल नाक्यावर पीएमपीएमएल बसेसला आकारल्या जात असलेल्या टोलच्या मुद्द्यावरून पीएमपीएमएल प्रशासनाने थेट बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पुरंदर तालुक्यात खळबळ निर्माण झाली होती. दरम्यान आमदार विजय शिवतारे यांच्या मध्यस्थीने टोल आकारणी संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या सोयीसाठी, या रस्त्यावरील टोल आकारणी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय झाला असून टोलच्या या प्रश्नावर आता संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि टोल कंपनी यांच्यात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील ठोस निर्णय होईपर्यंत टोल आकारणी बंद राहील.

आमदार विजय शिवतारे यांच्या पुढाकाराने आणि शिष्टाईमुळे पीएमपीएमएल कडून स्थगित करण्यात आलेली सासवड, जेजुरी बस सेवा पुन्हा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दररोज प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी, नोकरीवर जाणारे कर्मचारी, शेतकरी, भाविक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शुक्रवारी (दि.३ ) सकाळपासून सर्व बसेस नेहमीच्या वेळापत्रकानुसार नियमितपणे धावणार आहेत. प्रशासकीय पातळीवर या निर्णयाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात आली आहे.

पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक ऍलीस पोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आणि राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक यांच्या समवेत मंगळवारी संयुक्त बैठक होईल. या बैठकीत टोल बाबत योग्य ते निर्णय घेतले जातील. सध्या बस सेवा पूर्ववत करण्याच्या सूचना पी एम पीएमपीएमएल प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागणार नाही याची पूर्णतः काळजी घेतली जाईल.

विजय शिवतारे आमदार, पुरंदर-हवेली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news