

पुणे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या नियमित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढीसह 18 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत कालावधी दिला आहे.
त्यानुसार आज मंगळवारी (दि. 1 एप्रिल) प्रवेशासाठी शेवटची संधी आहे. दरम्यान, नियमित तसेच प्रतीक्षा यादी मिळून तब्बल 79 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यातील 8 हजार 863 शाळांमध्ये 1 लाख 9 हजार 102 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 3 लाख 5 हजार 151 अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर 10 मार्चपर्यंत 69 हजार 712 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश 18 मार्चपासून सुरू करण्यात आले. त्यासाठी 24 मार्चपर्यंत मुदत दिली. त्यानंतर 1 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, आत्तापर्यंत पहिल्या प्रतीक्षा यादीत 9 हजार 932 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नियमित आणि प्रतीक्षा यादी मिळून तब्बल 79 हजार 644 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणार्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी साधारण चार फेर्या राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे 24 मार्च ते 1 एप्रिल ही मुदतवाढ प्रवेशासाठी अंतिम मुदतवाढ राहणार असून, 2 एप्रिलनंतर दुसर्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी संधी दिली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
25 कोटींहून अधिक निधी
राज्य सरकारने आरटीईद्वारे प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची शुल्कप्रतीपूर्ती करण्यासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध केला आहे. 31 मार्चला देखील 25 कोटी 13 लाख 44 हजार रुपये प्राथिमक शिक्षण संचालना लयाकडे देण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या माध्यमातून अनेक शाळांची थकीत शुल्कप्रतीपूर्ती देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.