

पुणे: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (तिथीनुसार) सोमवारी (दि. 17) मिरवणुका, शिवपूजन यासह वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विविध संस्था आणि मंडळांच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले असून, शिवजयंती उत्सवाची तयारीही पूर्ण झाली आहे. शहर आणि उपनगरांत छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या जयंतीचा (तिथीनुसार) उत्साह पाहायला मिळत आहे.
छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने (तिथीनुसार) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रविवारी (दि.16) शिवजयंतीची तयारी शहर आणि उपनगरात पाहायला मिळाली. उत्सव मंडपाच्या उभारणीसह कार्यक्रमांचे नियोजन करण्यात कार्यकर्ते, पदाधिकारी व्यग्र दिसले.
शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत, त्याबाबतची तयारी करतानाही कार्यकर्ते, पदाधिकारी पाहायला मिळाले. सोमवारी (दि.17) शिवजयंती उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाणार आहे. कोथरूड येथील छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या ठिकाणीही सजावट केली असून, ’जय भवानी, जय शिवाजी...’असा जयघोष सगळीकडे दुमदुमणार आहे.
कोथरूड येथील श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या वतीने ‘शिव महोत्सव 2025’ चे आयोजन केले आहे. यानिमित्ताने छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या पावलाच्या अस्सल ठशांवरून तयार करण्यात आलेल्या चांदीतील प्रतिकृतीचे दर्शन घेता येणार आहे.
सोमवारी (दि.17) सायंकाळी सहा वाजता कोथरूड येथील छत्रपती श्रीशिवाजी महाराज स्मारक येथे हा कार्यक्रम होईल. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, युवा उद्योजक पुनीत बालन, भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, दिग्दर्शक प्रवीण तरडे या वेळी उपस्थित राहणार आहेत, छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होणार असून, नादब्रह्म ढोल पथकाचे स्थिर वादन होईल,अशी माहिती प्रतिष्ठानचे दुष्यंत मोहोळ यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी (दि.17) सायंकाळी सात वाजता कोंढवा खुर्द येथील नरवीर तानाजी मालुसरे चौक येथे शिववंदना होणार आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक साईनाथ बाबर यांनी दिली.
गुरुवार पेठेतील प्रभात मित्रमंडळाच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवात मिरवणुकीसह शिवआरती होणार आहे. गुरुवार पेठेतील कृष्णाहट्टी चौकात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल. हत्ती गणपती चौकातील शिवोत्सव आयोजन समितीतर्फे शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. हत्ती गणपती चौकापासून मिरवणुकीस सुरुवात होईल, अशी माहिती संयोजकांनी दिली.