

पुणे: शेतकर्याने पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी भागात घडली. बाळासाहेब निवृत्ती कुंजीर (वय 61) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. कुंजीर यांच्याकडे शस्त्रपरवाना होता.
बाळासाहेब कुंजीर यांना मधुमेहाचा त्रास होता. चार वर्षांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. या संसर्गात त्यांचा एक डोळा निकामी झाला होता. ते घरात असायचे. त्यांच्या हालचालींवर मर्यादा यायच्या. कुंजीर यांच्या नात्यातील एकाच्या घरी शुक्रवारी कार्यक्रम होता.
कुंजीर कुटुंबीय कार्यक्रमासाठी गेले होते. कुंजीर घरात एकटे होते. त्यांनी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून घेतली. कुंजीर यांच्या मुलाने या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. आजारपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.