पुणे: तिळगूळ घ्या, गोड गोड बोला... असे म्हणत स्नेह अन् आपुलकी वाढविणारा सण म्हणजे मकर संक्रांत मंगळवारी (दि. 14) उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे तिळाची वडी, तिळाचे लाडू, गुळाच्या वड्या, तिळाच्या हलव्याची खरेदीही सुरू झाली असून, तिळाच्या वडीपासून ते तिळाच्या लाडूपर्यंतचे पदार्थ तयार करण्यास सुरुवात झाली आहे.
होलसेल व्यावसायिकांकडे तिळगूळ आणि तिळाच्या वडीला सर्वाधिक मागणी आहे. कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते राजकीय पक्षापर्यंत... किराणामालाच्या दुकानापासून ते मिठाई दुकानापर्यंत... सर्वांकडून वडीपासून ते लाडूपर्यंतची खरेदी होत आहे. चॉकलेट, ड्रायफ्रूट, रंगीत केशरी, पिवळा, हिरवा असे हलव्याचे विविध प्रकारही उपलब्ध आहेत. तिळवडीमध्ये स्पेशल नरम तिळवडी, मँगो तिळवडी, केशर तिळवडी, पिस्ता तिळवडी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तिळवड्या पाहायला मिळतील.
मकर संक्रांत हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. सणाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग पाहायला मिळते. यंदा तिळाची वडी, तिळाचे लाडू, गुळाच्या वड्या, तिळाचा हलवा याच्या खरेदीसाठीही दुकानांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. हलव्याच्या दागिन्यांच्या खरेदीलाही प्राधान्य दिले जात आहेत. ठिकठिकाणी स्विट मार्टवाल्यांच्या कारखान्यांमध्ये तिळाचे लाडू ते तिळाच्या वडीपर्यंत वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची तयारी पाहायला मिळत आहे.
व्यावसायिक महेश प्रभाकर ढेंबे म्हणाले, आमची तिसरी पिढी तिळगूळ विक्रीच्या व्यवसायात कार्यरत आहे. दरवर्षी संक्रांतीच्या काही दिवस आधी आम्ही तयारी करतो. टप्प्याटप्प्याने साहित्य तयार केले जाते. सणाला अवघे काही दिवस उरल्याने मागणी वाढली असून, कॉर्पोरेट कंपन्या, आयटी कंपन्या, राजकीय पक्षातील नेते, किराणा दुकान, मिठाई दुकानांकडून तिळगूळ आणि तिळाच्या वडीलासर्वाधिक मागणी होत आहे.
पांढऱ्या तिळाचा हलवा, तिळाच्या लाडूलाही मागणी आहे. तिळगूळ 160 रुपये किलोपर्यंत उपलब्ध आहे, तर तिळाची वडी 240 रुपये किलोपासून ते 320 रुपये किलोपर्यंत उपलब्ध आहे. लहान मुलांचे हलव्याचे दागिने, महिला आणि पुरुषांचे हलव्याचे दागिनेही आमच्याकडे उपलब्ध असून, माझी पत्नी मनीषा या हलव्याचे दागिने तयार करत आहे.