PM Modi Pune Sabha: पंतप्रधानांच्या दौर्‍यानिमित्त कडेकोट पोलीस बंदोबस्त

केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून सुरक्षाव्यवस्थेचा आढावा
PM Modi Pune Sabha
पंतप्रधानांच्या दौर्‍यानिमित्त कडेकोट पोलीस बंदोबस्तFile Photo
Published on
Updated on

Narendra Modi News: विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी (12 नोव्हेंबर) पुण्यात आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचेही अधिकारी शहरात दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. पुणे पोलिसांसह या दौर्‍याची मुख्य जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे असणार आहे.

लोहगाव विमानतळ ते सभास्थळापर्यंतच्या मार्गाची पाहणी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला.दरम्यान, कार्यक्रम स्थळ, लगतचा परिसर, तसेच सभेच्या ठिकाणची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी वाहतूक विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला.

PM Modi Pune Sabha
PM Modi Sabha: पंतप्रधान मोदी यांची आज पुण्यात सभा

शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकारी, तसेच कर्मचार्‍यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वानपथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक बंदोबस्तास राहणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त, 23 सहायक पोलीस आयुक्त, 135 पोलीस निरीक्षक, 570 पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

वाहतुकीचेही काटेकोर नियोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा मंगळवारी स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या आगमनानिमित्त पोलिसांनी सोमवारी सायंकाळी बंदोबस्ताची रंगीत तालीम केली. जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आल्याने मध्य भागात वाहतूक कोंडी झाली.

रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आल्यानंतर कोंडी कमी झाली. पंतप्रधान मोदी यांच्या आगमनानिमित्त शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे, त्या मार्गावर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी बंदोबस्ताची रंगीत तालीम केली.

जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. या रस्त्यांना जोडणारे उपरस्ते बंद करण्यात आले. त्यामुळे कार्यालयातून घरी परतणारे नागरिक कोंंडीत अडकले. जंगली महाराज रस्ता, घोले रस्ता, आपटे रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. तसेच, टिळक रस्ता, सदाशिव पेठ, शास्त्री रस्ता परिसरात कोंडी झाली. पोलिसांनी रंगीत तालमीसाठी पंधरा ते वीस मिनिटे रस्ते बंद केले होते.

PM Modi Pune Sabha
आमदारांनी जनतेचा स्वाभिमान गहाण ठेवला : आ. शशिकांत शिंदे

‘ड्रोन’ उड्डाणास बंदी

सुरक्षेच्या कारणास्तव मंगळवारी शहरात ड्रोन कॅमेरे, तसेच पॅराग्लायडरच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली असून, आदेशाचा भंग करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले आहेत. पंतप्रधानांची सभेच्या ठिकाणी ड्रोन कॅमेरे वापरास बंदी घालण्यात आली आहे. पॅराग्लायडर, हलकी विमाने (मायक्रो लाइट एअरक्राफ्ट), हॉट एअर बलूनच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे.

शहरात आज काही ठिकाणी ‘दुतर्फा नो पार्किंग’

आज वाहतुकीतील बदलाबरोबरच काही ठिकाणी नो पार्किंग केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मंगळवारी (दि.12) शहरात असल्यामुळे सकाळी सहा ते रात्री बाराच्या सुमारास गोल्फ क्लब चौक ते आंबेडकर चौक, संचेती चौक ते खंडोजीबाबा चौक (जंगली महाराज रस्ता), टिळक चौक ते नाथ पै चौक (शास्त्री रोड) आणि खंडोजी बाबा चौक ते वीर चाफेकर चौक (फर्ग्युसन कॉलेज रस्ता) या ठिकाणी दोन्ही बाजूंना नो पार्किंगची व्यवस्था केली असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news