

पुणे: हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवण्याचा कारभार सुलभ आणि वेगवान व्हावा, याकरिता परिवहन विभागाकडून राज्यात तीन झोन (विभाग) तयार करण्यात आले आहेत.
त्या झोनमध्ये राज्यातील आरटीओ कार्यालयांची विभागणी करण्यात आली असून, यामुळे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे कामकाज वेगाने होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राज्यभरात एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसवण्यासाठी परिवहन विभागामार्फत तीन झोन तयार करण्यात आले आहेत. त्या झोनअंतर्गत (विभाग) एचएसआरपी बसवण्याची नियोजन सुरू करण्यात आले आहे.
प्रत्येक झोन अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयांची नियुक्ती करण्यात आली आहे. झोन एक अंतर्गत बारा, झोन दोन अंतर्गत 18, तर झोन तीन अंतर्गत 27 आरटीओ कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे.
यामुळे राज्यभरात असलेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे कामकाज सुलभ पद्धतीने व वेगाने होणार आहे. 31 मार्च 2025 पूर्वी राज्यातील 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना एचएसआरपी बसवणे बंधनकारक आहे, त्यानुसार ही कार्यवाही परिवहन विभागाकडून सुरू आहे.
झोन 1 मधील आरटीओ कार्यालये
बोरिवली, ठाणे, पनवेल, कोल्हापूर, पुणे, नांदेड, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर (ईस्ट), नागपूर (यू), इचलकरंजी
झोन 2 मधील आरटीओ कार्यालये
मुंबई सेंट्रल, मुंबई (ईस्ट), वसई, कल्याण, पेण (रायगड), रत्नागिरी, मालेगाव, नंदुरबार, सातारा, फलटण, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, वर्धा, नागपूर (रुरल), गोंदिया, गडचिरोली
झोन 3 मधील आरटीओ कार्यालये
मुंबई (वेस्ट), वाशी (नवी मुंबई), सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नाशिक, श्रीरामपूर, धुळे, जळगाव, भाडगाव, चाळीसगाव, सांगली, कराड, अकलूज, बारामती, बीड, जालना, अंबाजोगाई, लातूर, उदगीर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अकोला, बुलडाणा, खामगाव, भंडारा, चंद्रपूर.
राज्य शासनाने एचएसआरपीचे काम वेगाने व्हावे, याकरिता राज्यात तीन झोनमध्ये वर्गीकरण केले आहे. त्या झोनअंतर्गत एचएसआरपी बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुणे झोन एकमध्ये येत असून, याकरिता रोझ मार्टा सेफ्टी सिस्टीम म्हणून वेंडर आहेत. त्याची सर्व माहिती आणि एचएसआरपीसाठीची अर्ज प्रक्रिया ’ट्रान्सपोर्ट. जीओव्ही.इन’ या संकेतस्थळावरून करता येईल.
- स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे